तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीला 179 शेतकऱ्यांनी मिळून हरवलं

| Updated on: May 25, 2019 | 8:36 PM

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी कल्वकुंतला कविता यांचा या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. टीआरएसच्या तिकिटावर निवडणूक लढत असलेल्या कविता यांच्याविरोधात निजामाबादमधून 179 शेतकऱ्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघात भादप उमेदवार अरविंद धर्मपुरी यांनी 70 हजार 785 मतांनी विजय मिळवला. या मतदारसंघात शेतकऱ्यांनी तेलंगणा सरकारविरोधात वातावरण निर्माण केलं होतं. निजामाबादमधून […]

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीला 179 शेतकऱ्यांनी मिळून हरवलं
Follow us on

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी कल्वकुंतला कविता यांचा या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. टीआरएसच्या तिकिटावर निवडणूक लढत असलेल्या कविता यांच्याविरोधात निजामाबादमधून 179 शेतकऱ्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघात भादप उमेदवार अरविंद धर्मपुरी यांनी 70 हजार 785 मतांनी विजय मिळवला.

या मतदारसंघात शेतकऱ्यांनी तेलंगणा सरकारविरोधात वातावरण निर्माण केलं होतं. निजामाबादमधून कविता यांना 4,09,481, अरविंद धर्मपुरी यांना 4,79,748 आणि 179 शेतकऱ्यांना 98,723 मतं मिळाले. त्यामुळे या शेतकऱ्यांनी घेतलेली मतंच कविता यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली. या मतदारसंघातून एकूण 186 उमेदवार मैदानात होते. 179 शेतकरी आणि विविध पक्षांचे इतर उमेदवार होते. शेतकऱ्यांनी डिपॉझिटसाठीचे प्रत्येकी 25-25 हजार रुपयेही जमा केले होते.

कविता यांनी प्रचारादरम्यान दिलेला एक सल्लाच त्यांना महागात पडला. तेलंगणाच्या एक हजार शेतकऱ्यांनी वाराणसी आणि अमेठीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात लढायला हवं, म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव होईल, असा सल्ला कविता यांनी दिला होता. हा सल्ला त्यांच्यावरच उलटला.

या शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी निवडणूक लढवली. केसीआर यांच्या सरकारकडे शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या होत्या. हळदीचे दर एवढे घसरले आहेत, की एका एकरात 40 हजार रुपयांचं नुकसान होत आहे, असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. तेलंगणामध्ये देशातील एकूण 13 टक्के हळद पिकवली जाते.

राष्ट्रीय हळद बोर्डाची नियुक्ती केली जावी, हळद आणि लाल ज्वारीचं मूल्य निश्चित करावं, ही मागणी होती. एक क्विंटल हळद पिकवण्यासाठी सात हजार रुपये खर्च आहे, पण बाजारात पाच हजार रुपये खर्च लागतो. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अक्षरशः लूट केली जाते, पण सरकारकडून काहीही केलं जात नाही, असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. याच निर्णयाचा विरोध करत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्याच मुलीला आव्हान दिलं.

तेलंगणाचे शेतकरी त्यांच्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. जमीनदार आणि निजामाविरोधात 1946-48 मधील शेतकरी विद्रोहाच्या आठवणी तेलंगणात आजही ताज्या आहेत. 1996 च्या निवडणुकीत फ्लोराईड समस्येने त्रस्त असलेल्या 480 शेतकऱ्यांनी नलगोंडा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. सर्व शेतकऱ्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. पण सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललं होतं.