गुवाहाटीत नेमकं काय घडलं? डील कुणी कुणी केली? ईडीची चौकशी कराच; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याने केली मागणी

| Updated on: Nov 01, 2022 | 5:37 PM

भाजपच्या सांगण्यावरून हे सर्व झालं असेल तर गेलेल्या सर्व 40 आमदारांना हिंदुत्वच कळलं नाही. यांचं हिंदुत्व हे देवेंद्र फडणवीस यांनी जाग केलं होतं असाच याचा अर्थ होतो.

गुवाहाटीत नेमकं काय घडलं? डील कुणी कुणी केली? ईडीची चौकशी कराच; ठाकरे गटाच्या या नेत्याने केली मागणी
गुवाहाटीत नेमकं काय घडलं? डील कुणी कुणी केली? ईडीची चौकशी कराच; ठाकरे गटाच्या 'या' नेत्याने केली मागणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अमरावती: माझ्या एका फोनवर बच्चू कडू (bacchu kadu) गुवाहाटीला गेले होते. त्यांनी कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला नाही, असा गौप्यस्फोट राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला आहे. त्यामुळे गुवाहाटीची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. गुवाहाटीत नेमकं काय झालं? या आमदारांना किती पैसे मिळाले? कुणा कुणात डील झाली होती? असे प्रश्न या निमित्ताने विचारले जाऊ लागले आहेत. ठाकरे गटातील शिवेसनेच्या (shivsena) एका नेत्याने तर गुवाहाटी प्रकरणाची चौकशीच करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे गुवाहाटीची चौकशी होणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आल्यानंतर त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे अमरावतीचे जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी या गुवाहाटीच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत.

बच्चू कडू यांनी खोके घेतल्याचा दावा रवी राणा यांनी केला होता. मात्र, बच्चू कडू यांनी खोके घेतले नसल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. बच्चू कडूंनी पैसे घेतले नसतील तर मग 49 आमदारांनी पैसे घेतले होते का? हे क्लिअर झालं पाहिजे. त्यासाठी या प्रकरणाची ईडीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुधीर सूर्यवंशी यांनी केली आहे.

आधीच फडणवीस यांनी आपणच बच्चू कडूंना गुवाहाटीला जाण्यासाठी फोन केल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना गुवाहाटीला पाठवण्यास फडणवीस जबाबदार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

त्यामुळे या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे. आता या प्रकरणात रवी राणा माफीचे साक्षीदार झाले तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील, असं सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिंदे यांच्या बंडांशी काहीही संबंध नसल्याचे भाजपकडून सांगण्यात येत होते.

मात्र बच्चू कडू यांना मीच फोन करून गुवाहाटीला जायला सांगितलं असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे या बंडामागे भाजपचा हात असल्याचं आता लपून राहिलं नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

भाजपच्या सांगण्यावरून हे सर्व झालं असेल तर गेलेल्या सर्व 40 आमदारांना हिंदुत्वच कळलं नाही. यांचं हिंदुत्व हे देवेंद्र फडणवीस यांनी जाग केलं होतं असाच याचा अर्थ होतो.

हे बंडखोर आमदार देवेंद्र फडणवीस यांचे सारथी ठरले. बंडखोरी ही सत्यासाठी नव्हे तर सत्तेसाठी होती, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.