Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांच्यासह 7 जणांचं मंत्रिपद धोक्यात? शिवसेनेकडून राज्यपालांना पत्र देण्याची तयारी

| Updated on: Jun 25, 2022 | 6:34 PM

संध्याकाळपासून बंडखोर आमदारांवर कारवाईचे संकेतही खासदार संजय राऊत यांनी दिलेत. अशावेळी आता एकनाथ शिंदे यांच्यासह 7 जणांचे मंत्रिपद धोक्यात असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धवन ठाकरे राज्यपालांना पत्र लिहून ही मागणी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांच्यासह 7 जणांचं मंत्रिपद धोक्यात? शिवसेनेकडून राज्यपालांना पत्र देण्याची तयारी
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी आता शिवसेनाही चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात आज शिवसेना भवनात कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत 6 ठराव मंजूर करण्यात आले. त्यात बंडखोरी किंवा गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिक उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेत. आज संध्याकाळपासून बंडखोर आमदारांवर कारवाईचे संकेतही खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलेत. अशावेळी आता एकनाथ शिंदे यांच्यासह 7 जणांचे मंत्रिपद धोक्यात असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धवन ठाकरे राज्यपालांना पत्र लिहून ही मागणी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर कारवाईसाठी शिवसेनेकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. शिंदे यांच्यासह 16 आमदारांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करण्यासाठी शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे 16 पिटिशन सादर करण्यात आले आहेत. या आमदारांचं निलंबन होणारच असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासह 7 जणांचे मंत्रिपदही काढून घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कोणत्या नेत्यांचं मंत्रिपद धोक्यात?

  1. एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्री
  2. शंभुराज देसाई – गृह राज्यमंत्री
  3. गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री
  4. अब्दुल सत्तार – महसूल राज्यमंत्री
  5. दादा भुसे – कृषी मंत्री
  6. बच्चू कडू – शालेय शिक्षण राज्यमंत्री
  7. संदिपान भुमरे – रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री

संजय राऊतांचे कारवाईचे संकेत

बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येणार का? आणि काय कारवाई करण्यात येणार? असा सवाल विचारण्यात आला. त्यावेळी ही शिवसेना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि राहील. ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दापरी केली. मग ते कोणत्याही पदावर असोत, त्यांच्यावर कठोर कारवाईचे सर्वाधिकारी उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. लवकरच त्यावर अंमलबजावणी होईल. आज संध्याकाळपर्यंत कारवाई काय ते स्पष्ट होईल, कोण मंत्रिपदावर राहणार, कोण नाही ते दिसेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत.