भाजपने विरोधकांना कधीही देशद्रोही समजलं नाही, अडवाणींचा जाहीर ब्लॉग

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगच्या माध्यमातून भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 6 एप्रिल हा भाजपचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने सध्याच्या भाजपला अडवाणींनी आरसा दाखवला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून भाजपने आपले राजकीय शत्रू असणाऱ्यांचा कधीही विचार केलेला नाही, पण फक्त विरोधक म्हणून विचार केलाय, असंही त्यांनी म्हटलंय. अडवाणींनी ब्लॉगमध्ये काय म्हटलंय? […]

भाजपने विरोधकांना कधीही देशद्रोही समजलं नाही, अडवाणींचा जाहीर ब्लॉग
Follow us on

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगच्या माध्यमातून भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 6 एप्रिल हा भाजपचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने सध्याच्या भाजपला अडवाणींनी आरसा दाखवला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून भाजपने आपले राजकीय शत्रू असणाऱ्यांचा कधीही विचार केलेला नाही, पण फक्त विरोधक म्हणून विचार केलाय, असंही त्यांनी म्हटलंय.

अडवाणींनी ब्लॉगमध्ये काय म्हटलंय?

“6 एप्रिल हा आपण भाजपचा स्थापना दिवस म्हणून साजरा करतो. मागे वळून पाहताना हा आपल्यासाठी एक विशेष दिवस आहे. पक्षाचा एक स्थापना सदस्य म्हणून माझ्या भावना जनतेशी आणि विशेषतः कार्यकर्त्यांशी शेअर करणं हे माझं कर्तव्य आहे. या कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रेमाचा आणि आदराचा मी ऋणी आहे. माझ्या भावना व्यक्त करण्यापूर्वी मी गांधीनगरच्या लोकांचे आभार मानतो, ज्यांनी मला 1991 पासून सहा वेळा खासदार म्हणून निवडून दिलं.

मातृभूमीसाठी काम करणं ही तीव्र इच्छा होती आणि वयाच्या 14 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम सुरु केलं. त्यानंतर जन संघ आणि भाजपचाही मी स्थापना सदस्य आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांसोबत काम करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. माझ्या जीवनाचं मार्गदर्शक तत्व आहे की देश अगोदर, नंतर पक्ष आणि स्वतः शेवटी. प्रत्येक परिस्थितीत मी हे तत्व पाळण्याचा प्रयत्न केलाय.

बळकट लोकशाहीसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचं असतं. भाजपने स्थापनेपासूनच कधीही आपल्या विचारधारेशी सहमत नसणाऱ्यांना शत्रू समजलेलं नाही. भलेही ते आपले विरोधक असतील. त्याचप्रमाणे आपल्याशी राजकीयदृष्ट्या सहमत नसणाऱ्यांना देशद्रोही देखील समजलेलं नाही. हा पक्ष राजकीयदृष्ट्या निवड स्वातंत्र्यासाठी बांधील आहे. लोकशाहीचं संरक्षण आणि लोकशाहीची परंपरा, मग ती पक्षातही हीच भाजपची ओळख आहे. त्यामुळेच लोकशाहीमधील संस्था आणि माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी भाजपने कायम पुढाकार घेतलेला आहे. निवडणुकांमधील सुधारणा, भ्रष्टाचारमुक्त राजकारण याला भाजपचं कायम प्राधान्य राहिलेलं आहे.

एकूणच, सत्य, देशभक्ती आणि लोकशाही (देशात आणि पक्षात) हीच भाजपची ओळख राहिलेली आहे. माझा पक्ष हा संस्कृतीक देशभक्तीसाठी ओळखला गेलाय. आणीबाणीविरोधात याचसाठी लढा दिला होता, जेणेकरुन ही मूल्य जिवंत राहतील. आपण सर्वांनी मिळून देशाच्या बळकट लोकशाहीसाठी काम करायला हवं. निष्पक्ष निवडणुका या लोकशाहीचा उत्सव असतात. मीडिया, समाजातील सर्व घटक आणि राजकीय पक्ष यांनी एकत्रित सहभाग घेण्याचं हेच एक निमित्त असतं.”

लालकृष्ण अडवाणी