जेनेलियाच नाही, विलासरावांच्या तिन्ही सुनांचे फिल्मी बॅकग्राऊण्ड, धाकट्या सूनबाई अभिनेत्याची बहीण

| Updated on: May 10, 2021 | 4:04 PM

अमित देशमुख यांची पत्नी अदिती प्रताप अभिनेत्री आहे, तर धीरज देशमुख यांची पत्नी दीपशिखा देशमुख निर्माती आहे. (Vilasrao Deshmukh Family Son Riteish Deshmukh )

जेनेलियाच नाही, विलासरावांच्या तिन्ही सुनांचे फिल्मी बॅकग्राऊण्ड, धाकट्या सूनबाई अभिनेत्याची बहीण
Vilasrao Deshmukh Family
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या तिन्ही सुपुत्रांनी आपापल्या क्षेत्रात दमदार वाटचाल सुरु केली आहे. ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्याकडे महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्रिपदाची धुरा आहे, तर धाकटे पुत्र धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत पहिल्याच झटक्यात लातूरमधून आमदारकी मिळवली. तर मधला सुपुत्र रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने बॉलिवूडमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. (Vilasrao Deshmukh Vaishali Deshmukh Family Son Riteish Deshmukh Dheeraj Deshmukh Amit Deshmukh info Daughter in law names Genelia Deshmukh)

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची लव्ह स्टोरी सर्वश्रुत आहे. मात्र जेनेलियाच नाही, तर देशमुख कुटुंबाच्या इतर दोन सुनांचीही फिल्मी बॅकग्राऊण्ड आहे. अमित देशमुख यांची पत्नी अदिती प्रताप (Aditi Pratap) प्रख्यात अभिनेत्री आहे, तर धीरज देशमुख यांची पत्नी दीपशिखा देशमुख (Deepshika Deshmukh) निर्माती आहे. ती ज्येष्ठ चित्रपट निर्माते वासू भगनानी यांची कन्या आणि अभिनेता जॅकी भगनानी याची बहीण आहे.

अमित देशमुख-अदिती प्रताप

अमित देशमुख यांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं. लातूर नगरपरिषद निवडणुकांसाठी त्यांनी काम केलं. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासाठी काम केलं. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विलासरावांच्या सीटवरुन अर्थात लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांनी 89 हजार 480 इतक्या मताधिक्याने (त्यावेळी राज्यातील चौथ्या क्रमांकाचे विक्रमी मताधिक्य) विजय मिळवला होता.

2009 पासून सलग तिसऱ्यांदा ते लातूर शहरचे काँग्रेस आमदार आहेत. 2014 मध्ये आघाडी सरकारच्या काळात अल्प कालावधीसाठी त्यांनी महसूल, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्रिपद सांभाळले होते. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांना वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक विभागाचे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.

अदिती प्रताप मालिकांतील लोकप्रिय चेहरा

45 वर्षीय अमित देशमुख आणि अदिती प्रताप यांचा विवाह 2008 मध्ये झाला. त्यांना अवीर आणि अवान ही दोन मुलं आहेत. अदिती प्रताप हिने लग्नापूर्वी सात फेरे, मान यासारख्या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. जवळपास सात वर्ष तिने अभिनय आणि मॉडेलिंग केलं. उर्मिला मातोंडकरची भूमिका असलेल्या बनारस- अ मिस्टिक लव्ह स्टोरी या सिनेमातही अदिती झळकली होती.

अदितीचं बालपण बंगळुरु आणि दिल्लीत गेलं. त्यानंतर मनोरंजन विश्वात येण्यासाठी तिने मुंबई गाठली. सात फेरे या पहिल्याच मालिकेत तिला मोठा ब्रेक मिळाला होता. अदिती घराघरात पोहोचली होती. तिच्या सासूबाई वैशाली देशमुख यांनाही अदितीचं मालिकेतील काम पसंतीस पडलं होतं.

अदिती आणि अमित यांचा विवाह झाला, त्यावेळी विलासराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अदिती आणि अमित यांचे लव्ह मॅरेज असेल, असा अनेकांनी ठोकताळा बांधला होता. मात्र आमच्या कुटुंबांनी हे लग्न ठरवलंय, असं सांगत अदितीने त्यावेळी हे अरेंज मॅरेज असल्याचं स्पष्ट केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या सूनबाई होण्याचा आनंद तेव्हा तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.

अमित देशमुख आणि अदिती देशमुख

धीरज देशमुख-दीपशिखा भगनानी

विलासरावांचे धाकटे पुत्र, 41 वर्षीय धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. पहिल्याच निवडणुकीत ते 1 लाख 21 हजार 482 च्या मताधिक्याने निवडून आले. हे त्यावेळी राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचं विक्रमी मताधिक्य ठरलं होतं. धीरज यांनी युथ काँग्रेसचे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिलं आहे. तर 2017 मध्ये ते लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य होते.

वासू भगनानींची कन्या देशमुखांची सून

ज्येष्ठ चित्रपट निर्माते वासू भगनानी यांची कन्या आणि अभिनेता जॅकी भगनानी याची बहीण दीपशिखा धीरज देशमुख यांची पत्नी आहे. 2012 मध्ये धीरज आणि दीपशिखा विवाहबंधनात अडकले. त्यांना वंश आणि दिवियाना अशी दोन मुलं आहेत. दीपशिखाने पूजा एंटरटेनमेंट अंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

2016 मध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि रणदीप हुडा यांची मुख्य भूमिका असलेल्या सरबजीत चित्रपटापासून दीपशिखाने प्रोड्युसर म्हणून इनिंग सुरु केली. मदारी, सर्वान्न, वेलकम टू न्यूयॉर्क, जवानी जानेमन, कुली नंबर वन रिमेक, दिल जंगली अशा सिनेमांचीही तिने निर्मिती केली आहे. गणपत आणि बेलबॉटम हे तिचे आगामी चित्रपट आहेत.

याशिवाय दीपशिखाने लव्ह ऑर्गेनिकली (Love Organically) या स्कीनकेअर ब्रँडची स्थापना केली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी धीरज आणि दीपशिखा काम करत आहेत. दीपशिखाला पॉवर वुमन, यंग एन्टरप्रिन्युअर अशा अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे.

रितेश देशमुख-जेनेलिया डिसुझा

विलासराव देशमुख यांचे द्वितीय सुपुत्र रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांनी 2003 मध्ये तुझे मेरी कसम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. दोघांचा हा पहिलाच सिनेमा होता. मोठ्या पडद्यावर एकत्र झळकलेली जोडी चाहत्यांना भावली. दोघांनी 2002 मध्ये डेटिंग सुरु केलं होतं.

डेटिंग करताना लग्नाचा सीन

लेखक मिलाप झवेरी आणि दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी रितेश-जेनेलियाच्या जोडीला मस्ती चित्रपटातून पुन्हा मोठ्या पडद्यावर आणायचं ठरवलं. 2003 मध्येच सिनेमाच्या निमित्ताने का होईना, दोघांना लग्नाचा सीन करावा लागला. भविष्यात काय होईल, माहिती नाही, पण या क्षणाचा आनंद आपण घ्यायला हवा, असं म्हणत आम्ही तो सीन हसण्यावारी नेला होता आणि पुढे गेलो, अशी आठवण रितेशने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितली होती.

रितेशच्या प्रँकमुळे ब्रेकअपची वेळ

रितेशने एके दिवशी जेनेलियासोबत प्रँक म्हणजेच खोडसाळपणा करण्याचं ठरवलं. त्यावेळी दोघांचं डेटिंग सुरु होतं. रितेशने खट्याळपणे जेनेलियाला मेसेज केला, की चल आपण वेगळे होऊ. मात्र जेनेलियानेही गोष्ट गांभीर्याने घेतली. खरंच प्रकरण ब्रेकअपवर आलं. शेवटी कसंबसं रितेशने हा आपला प्रँक असल्याचं जेनेलियाला समजावलं. त्यानंतर दोघांमध्ये कधीही वेगळं होण्याचा विषय निघाला नाही.

रितेश-जेनेलिया 2012 मध्ये विवाहबंधनात अडकले. आजच्या घडीला रितेश-जेनेलिया ही नावं आपसूकच एकत्र ओठी येतात. बॉलिवूडमधील रिअल लाईफ सेलिब्रिटी कपल्समध्ये त्यांचं नाव अग्रक्रमावर घेतलं जातं.

संबंधित बातम्या :

धीरज देशमुखांची भावनिक साद, रितेश-जेनेलियासह देशमुख कुटुंब भारावलं

Mothers Day निमित्त सासूबाईंचाही फोटो, जेनेलिया देशमुखची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

(Vilasrao Deshmukh Vaishali Deshmukh Family Son Riteish Deshmukh Dheeraj Deshmukh Amit Deshmukh info Daughter in law names Genelia Deshmukh)