आमचं सरकार येताच तुमचा हिशोब चुकता करु, काँग्रेस नेत्याची अधिकाऱ्यांना धमकी

चंदीगड : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या घरावर भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयकडून छापेमारी सुरु आहे. पण काँग्रेसने छापेमारी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच धमकी दिली आहे. कानउघडून ऐका, नवं सरकार येताच उत्तर देऊ, अशी धमकी काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिली. आता जास्त वेळ उरलेला नाही. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांवर […]

आमचं सरकार येताच तुमचा हिशोब चुकता करु, काँग्रेस नेत्याची अधिकाऱ्यांना धमकी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

चंदीगड : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या घरावर भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयकडून छापेमारी सुरु आहे. पण काँग्रेसने छापेमारी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच धमकी दिली आहे. कानउघडून ऐका, नवं सरकार येताच उत्तर देऊ, अशी धमकी काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिली.

आता जास्त वेळ उरलेला नाही. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांवर आरोप लावण्यात आलेले आहेत. पण तपास यंत्रणांना ते दिसत नाही का? असा सवालही आनंद शर्मा यांनी केला. राजकीय हेतूने सरकारकडून तपास यंत्रणांचा वापर करुन घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

विरोधी पक्षातील नेत्यांवर राजकीय द्वेषातून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हुड्डा यांच्यावर काही दिवसांपूर्वी अशीच कारवाई करण्यात आली होती. पण तपासात काहीच समोर आलं नाही. जींद पोटनिवडणुकीत हुड्डा एका सभेला संबोधित करायला जात होते, त्याचवेळी सीबीआयने छापेमारीची कारवाई केली, असं आनंद शर्मा म्हणाले.

सरकारच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या अधिकाऱ्यांना मी आत्ताच इशारा देतोय, विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे लागू नका विनाकारण.. नाहीतर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असा इशाराच या काँग्रेस नेत्याने अधिकाऱ्यांना दिला.

जमीन वाटप प्रकरणातील कथित भ्रष्टाचारप्रकरणी हुड्डा यांच्याविरोधात सीबीआयने आणखी एका गुन्ह्याची नोंद केली आहे. दिल्लीतील 30 ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली. त्यानंतर हरियाणातील रोहतकमध्ये जाऊनही अधिकाऱ्यांनी हुड्डा यांच्या निवासस्थानी छापेमारी केली.