सुजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर नगरमध्ये सद्यस्थिती काय?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

अहमदनगर : डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशामुळे नगर जिल्हयातील राजकीय समीकरणे पूर्ण बदलून गेली आहेत. सुजय विखेंच्या प्रवेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघात भयाण शांतता आहे. विखे आणि थोरात यांच्यातील संघर्षामुळे आघाडीकडून आता उमेदवार कोण, याकडे सर्व मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे. प्रमुख पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर न केल्याने राज्यात आणि देशात नेहमीच चर्चेत असलेल्या शिर्डी मतदारसंघातील […]

सुजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर नगरमध्ये सद्यस्थिती काय?
Follow us on

अहमदनगर : डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशामुळे नगर जिल्हयातील राजकीय समीकरणे पूर्ण बदलून गेली आहेत. सुजय विखेंच्या प्रवेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघात भयाण शांतता आहे. विखे आणि थोरात यांच्यातील संघर्षामुळे आघाडीकडून आता उमेदवार कोण, याकडे सर्व मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे. प्रमुख पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर न केल्याने राज्यात आणि देशात नेहमीच चर्चेत असलेल्या शिर्डी मतदारसंघातील वातावरण सध्या थंड आहे.

नेहमी चर्चेत असणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात लोकसभेचे उमेदवार कोण याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. कोणत्याही प्रमुख पक्षांनी अजुनही उमेदवार घोषित केले नसल्याने कार्यकर्त्यांमध्येही मरगळ आलेली दिसून येत आहे.

2009 साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना त्यावेळी शिर्डी  लोकसभेची उमेदवारी मिळाली. शरद पवार यांनी कॉग्रेसच्या कोट्यातून रामदास आठवले यांना उमेदवारी देण्यास भाग पाडले. रामदास आठवले काँग्रेसच्या चिन्हाऐवजी स्वतःच्या चिन्हावर निवडणूक  लढले. संपूर्ण देशाचे लक्ष आठवले यांच्या उमेदवारीमुळे शिर्डीकडे लागले होते. मात्र साईबाबा संस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी  राहीलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेकडून निवडणुक लढवली आणि रामदास आठवले यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. शिवसेनेच्या तिकिटावर वाघचौरे यांना लॉटरी लागली. तेव्हापासून हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे.

2014 च्या  लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाघचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमधे प्रवेश केला. शिवसेनेने बबनराव घोलप यांना उमेदवारी दिली. बेनामी संपत्तीच्या  प्रकरणामुळे बबनराव घोलप यांना माघार घ्यावी लागली. त्यानंतर केवळ 15 दिवसाच्या प्रचारात सदाशिव लोखंडे यांच्या पदरात खासदारकीची माळ पडली. भाऊसाहेब वाकचौरे यांनी सेनेशी केलेली बंडखोरी यामुळे शिवसेनिकांच्या रोषाला त्यांना सामोर जाव लागल.त्याही वेळी शिर्डी लोकसभा मतदार संघ चर्चेत राहिला.

2009 आणि 2014 या दोन पंचवार्षिक निवडणुकीत नेहमी चर्चेत राहीलेला शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय  वातावरण मात्र यावेळेस थंड आहे.शिवसेना -भाजपा युती होवु नये यासाठी भाऊसाहेब  वाकचैरे यांनी देव पाण्यात  ठेवले. मात्र मोठ्या नाट्यमय घडामोडी नंतर युती झाली आणि वाकचौरे यांच्या भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढण्याच्या आकांक्षावर विर्जन पडले. भाऊसाहेब वाकचौरे  हे सध्या भाजपात आहेत. शिर्डीची जागा शिवसेनेकडे असल्याने वाकचौरे  यांना मोठी अडचण  निर्माण  झाली आहे. आता अपक्ष निवडणूक  रिगंणात दोन हात करण्याचा  वाकचौरे यांचा इरादा आहे. त्यांनी  शिवसेनेकडेही प्रयत्न केले,  परंतु वाकचौरेंना  ठोस आश्वासन  मिळालेले नाही.  शिवसेनेच्या संभाव्य यादीत सदाशिव लोखंडे यांच्या नावाची  चर्चा आहे. तिन महिन्यांपुर्वी शिर्डीतील शिवसेना मेळाव्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोखंडेच उमेद्वार असल्याची घोषणा केली होती मात्र सदाशिव लोखंडे यांच्या उमेद्वारीची अधिकृत घोषणा झालेली नाही.

दुसरीकडे कॉग्रेसच्या उमेदवाराचे नावही अजून घोषीत नाही. केवळ नावांची चर्चाच आहे. कॉग्रेसकडून आ.भाऊसाहेब कांबळे, उत्कर्षा रुपवते, डॉ राजू वाघमारे यांची नावे चर्चेत असली तरी कॉग्रेसचा उमेदवार कोण? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

प्रमुख पक्षांची सुरु असलेली घालमेल सुरु असताना सर्वात अगोदर वंचित बहुजन आघाडी आणि भाकपने लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडुन डॉ.अरुण साबळे यांना उमेदवारी देत वंचित बहुजन आघाडीने सर्वांत अगोदर षटकार मारला. त्यापाठोपाठ आता भाकपने गोविंद पानसरे यांचे जावई बंसी सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मायावतींची बहुजन समाज पार्टी देखील उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. पंरतु बसपाला अद्यापही हवा तसा उमेदवार  मिळालेला नाही.

एकंदरीतच सर्वच राजकीय पक्षांच्या भूमिकांकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले असून शिर्डी लोकसभेचा शिवसेना आणि आघाडीचा उमेदवार कोण याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.