राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार की जयंत पाटील?

| Updated on: Nov 26, 2019 | 8:13 AM

राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांचीच अधिकृत नोंद आहे

राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार की जयंत पाटील?
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते (Legislative Leader of NCP) म्हणून विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील (Jayant Patil) यांचीच अधिकृत नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी यासंदर्भात स्पष्टता दिली. त्यामुळे बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार (Ajit Pawar) यांना व्हीप बजावण्याचा अधिकार नसून जयंत पाटलांकडेच त्याचे अधिकार असतील.

राष्ट्रवादीने विधिमंडळ गटनेतेपदाच्या निवडीचं पत्र काल (सोमवार 25 नोव्हेंबर) दिलं. त्यानुसार जयंत पाटीलच गटनेते असतील. त्यामुळे जयंत पाटील किंवा त्यांनी प्रतोद म्हणून निवड केली असेल त्यांचाच ‘व्हीप’ अधिकृत असेल.

उपमुख्यमंत्री अजित पवारांना व्हीप काढण्याचा कोणाताही अधिकार नाही. ज्यांना पद जाईल असा धोका वाटत आहे. त्यांनी काळजी करु नये. त्यांची जबाबदारी मी स्वतः घेतो, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आमदारांना दिली होती.

अजित पवारच राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते असल्याचा दावा भाजप करत होतं. त्यामुळे अजित पवारांनी व्हीप बजावल्यास आपल्याला भाजपच्या बाजूने मतदान करावे लागेल, अशी भीती काही आमदारांना सतावत होती. काही आमदारांनी मात्र आमदारकी गमवावी लागली, तरी शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाच्या बाजूनेच मत देण्याचा निर्धार व्यक्त केला होता.

विधिमंडळ गटनेता कोण निवडतं?

विधिमंडळ गटनेत्याची निवड पक्षाचा अध्यक्ष किंवा सरचिटणीस करतो. निवडीची माहिती 30 दिवसांत विधानसभा अध्यक्ष किंवा विधान भवनाच्या सचिवांकडे द्यावी लागते.

अजित पवारांच्या धमकीला घाबरु नका, तुमची जबाबदारी माझ्यावर : शरद पवार

राज्यपाल आणि विधिमंडळ या दोन स्वतंत्र घटनात्मक संस्था आहेत. दोन्ही ठिकाणी गटनेता निवडल्याची माहिती द्यावी लागते. राष्ट्रवादीने राज्यपालांकडे कोणती माहिती दिली हे विधानसभा अध्यक्षांना माहिती नसते. राष्ट्रवादीने अजित पवार यांची निवड केल्याची माहिती अध्यक्षांना कळवली नव्हती. त्यामुळे त्यांना विधिमंडळ गटनेता समजता येणार नाही.

राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून अजित पवार यांच्या नावाची नोंद पक्षाने विधान मंडळाकडे केलेली नाही. जयंत पाटील यांच्या निवडीची माहिती दिल्यामुळे तेच पक्षाचे विधिमंडळ गटनेते असतील.

शिवसेनेने गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचं पत्र दिलं आहे. काँग्रेसने अद्याप गटनेता निवडलेला नाही. ही निवड कधी करायची, हा सर्वस्वी त्या-त्या पक्षाचा अधिकार (Legislative Leader of NCP) असतो.