Bharat Gogawale : 14 आमदारांनाच नोटीस का? आदित्य ठाकरेंना का नाही?; गोगावलेंनी केला पहिल्यांदाच मोठा खुलासा

| Updated on: Jul 06, 2022 | 1:57 PM

Bharat Gogawale : आम्ही बाळासाहेबांचं ब्रीद वाक्य घेऊन जात आहोत. आम्ही शिवसेना सोडली नाही. सोडणार नाही.

Bharat Gogawale : 14 आमदारांनाच नोटीस का? आदित्य ठाकरेंना का नाही?; गोगावलेंनी केला पहिल्यांदाच मोठा खुलासा
14 आमदारांनाच नोटीस का? आदित्य ठाकरेंना का नाही?; गोगावलेंनी केला पहिल्यांदाच मोठा खुलासा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेनेच्या (shivsena) बंडखोर आमदारांकडे गटनेतेपद आणि पक्षप्रतोदपद आल्यानंतर या आमदारांनी आता थेट शिवसेनेच्याच आमदारांना नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी व्हीप मोडल्याने तुमच्यावर अपात्रतेची कारवाई का करू नये? असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. शिवसेनेच्या एकूण 14 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिंदे गटाने नोटीस बजावताना आदित्य ठाकरेंना का वगळलं? या मागची शिंदे गटाची रणनीती काय आहे? ही खेळी तर नाही ना? असे अनेक प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत. मात्र, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी त्यावर उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं म्हणूनच आदित्य यांना नोटीस बजावण्यात आली नाही, असं गोगावले यांनी म्हटलं आहे.

भरत गोगावले यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं तेच आम्ही केलं आहे. आम्ही सर्वच विसरलो नाही. मुख्यमंत्र्यांननी सांगितलं आदित्य ठाकरेंना बाजूला ठेवून 14 जणांना नोटीस द्या. म्हणून दिली, असं गोगावले यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी कोर्टातील अपात्रतेच्या नोटीशीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पाच, सहा दिवस बाकी आहे. 11 तारखेला दूध का दूध पानी का पानी होईल. आमच्याकडे येणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. कमी होणार नाही. वस्तुस्थिती आणि परिस्थिती काय आहे हा पाहून इतरांनी निर्णय घ्यावा, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राऊतांमुळेच बंडखोरी

संजय राऊत काय बोलतात त्याचे परिणाम काय होतात हे सर्वांना माहीत आहे. संजय राठोडांनी सांगितलं त्यात काही चूक नाही. राऊतांमुळे बंडखोरीची वेळ आली आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना बराचसा अवधी दिला होता. आम्ही वाट पाहत होतो. पण हे आमच्या लोकांची पदे काढून घेत होते. राऊतांची विधाने काळजाला घरं पाडणारी होती. काळजाला चरे पडत होते. नार्वेकरांना चर्चेला पाठवत होते आणि दुसरीकडे पदे काढून घेतली जात होती. तर राऊत तोंडाला येईल ते बोलत होते. त्यामुळे आम्हाला मजबुरीने हालचाली सुरू कराव्या लागल्या, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आदित्य सुरतला येणार होते की नाही माहीत नाही

मागच्या वेळी ज्या घडामोडी झाल्या. तशा यावेळी होतील असं राऊतांना वाटलं. पण आम्ही कट्टर होतो. राऊतांनी कुणाची सुपारी घेतली होती हे कळायला मार्ग नव्हता. आदित्य सुरतला येणार होते की नाही माहीत नाही. त्याची कल्पना शिंदेंना माहीत असावी. आम्ही त्यांच्याकडे अधिकार दिला होता. त्यामुळे त्यांना काहीच विचारत नव्हतो. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता, असं ते म्हणाले.

शिवसेना पदाधिकारी संपर्कात

आम्ही बाळासाहेबांचं ब्रीद वाक्य घेऊन जात आहोत. आम्ही शिवसेना सोडली नाही. सोडणार नाही. आम्ही शिवसेना वाढवण्याचं काम करत आहोत असं काहींना वाटलं तर ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू शकतात. जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि काही पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. 12 खासदार संपर्कात आहेत की नाही त्याची कल्पना नाही, असंही ते म्हणाले.