संकटमोचक ते यशस्वी ‘मध्यस्थ’, नार्वेकरांच्या राजभवनावरील भेटीमुळे राज्यपाल-मुख्यमंत्री कटुता मिटणार?

| Updated on: Jun 17, 2021 | 3:34 PM

मिलिंद नार्वेकर (Milind narvekar) हे आज दुसऱ्यांदा राजभवनावर गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत दुपारी 12.30 च्या सुमारास ते राजभवनावर उपस्थित होते. मात्र त्याआधीच म्हणजे सकाळी 9.30 वाजता मिलिंद नार्वेकर हे राजभवनावर पोहोचले होते.

संकटमोचक ते यशस्वी मध्यस्थ, नार्वेकरांच्या राजभवनावरील भेटीमुळे राज्यपाल-मुख्यमंत्री कटुता मिटणार?
Milind Narvekar
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वाढदिवसानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari birthday) यांची राजभवन (Rajbhawan) इथं भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. राज्यपाल कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त राज्यासह देशभरातील नेते शुभेच्छा देत आहेत. मुख्यमंत्र्यांशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राजभवनावर जाऊन अभिष्टचिंतन केलं. (Will bitterness between Governor Bhagat Singh Koshyari and CM Uddhav Thackeray bitterness to end after Mediated by Milind Narvekar? )

दरम्यान, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील कटुता जगजाहीर आहे. त्यातच 12 आमदारांच्या नियुक्तीवर राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा दीड वर्ष संघर्ष ताणला आहे. मात्र तरीही महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

मिलिंद नार्वेकर दुसऱ्यांदा राजभवनावर

मिलिंद नार्वेकर हे आज दुसऱ्यांदा राजभवनावर गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दुपारी 12.30 च्या सुमारास ते राजभवनावर उपस्थित होते. मात्र त्याआधीच म्हणजे सकाळी 9.30 वाजता मिलिंद नार्वेकर हे राजभवनावर पोहोचले होते. मिलिंद नार्वेकरांनी सर्वात आधी जाऊन राज्यपाल कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

नार्वेकर-कोश्यारी मैत्रीचे संबंध

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आहेत हे सर्वश्रुत आहेच मात्र त्यांनी शिवसेनेचे संकटमोचक किंवा यशस्वी मध्यस्थ म्हणून काम केल्याचं यापूर्वी अनेकवेळा दिसून आलं आहे.मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील संबंध ताणलेले असताना, मिलिंद नार्वेकर आणि राज्यपाल यांची आधी भेट होणं याला विशेष महत्व आहे. मिलिंद नार्वेकर हे 9.30 च्या आसपास राजभवनावर गेल्यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या भेटीची वेळ निश्चित केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री 12.30 च्या सुमारास राजभवनावर पोहोचले आणि त्यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, त्याच्या काही वेळ आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राजभवनावर जाऊन भगतसिंग कोश्यारींना शुभेच्छा दिल्या.

जरी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे संबंध ताणलेले असले, तरी मिलिंद नार्वेकर यांचे आणि राज्यपालांचे संबंध चांगले असल्याचं गणेशोत्सवकाळात दिसलं होतं. कारण स्वत: राज्यपालपदावरील व्यक्ती मिलिंद नार्वेकरांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. आता मिलिंद नार्वेकर हे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील कटुता दूर करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नार्वेकरांनी करुन दाखवलं

मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेनेसाठी अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. मग ते अपक्ष आमदारांची जुळवाजुळव करुन शिवसेनेचं संख्याबळ वाढवण्याचं असो की मग पारनेरचे राष्ट्रवादीत गेलेल्या नगरसेवकांना परत शिवसेनेत आणणं असो, मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाचे रोल निभावले.

अपक्ष आमदाराला शिवबंधन बांधलं

अहमदनगरमधील अपक्ष आमदार आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी गेल्या वर्षी ‘मातोश्री’वर शिवबंधन बांधलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गडाख यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना, मिलिंद नार्वेकर यांनी सर्वात आधी शंकरराव गडाख यांना गाठून, त्यांना विशेष विमानाने मुंबईत आणलं होतं.

पारनेरच्या नगरसेवकांना शिवबंधन

गेल्या वर्षीच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या पारनेरच्या नगरसेवकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत घरवापसी झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर हे नगरसेवक शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्यसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत चारच दिवसांपूर्वी शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले होते, त्याच लंके यांच्या उपस्थितीमध्ये या नगरसेवकांनी मातोश्रीवर पुन्हा शिवबंधन हाती बांधले. या सर्वांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती ती मिलिंद नार्वेकर यांनी.

कोण आहेत मिलिंद नार्वेकर

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासातले आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मिलिंद नार्वेकर काही वर्षांपूर्वी मातोश्रीवर शाखाप्रमुख पदाच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची नजर मिलिंद नार्वेकरांवर पडली. मिलिंद नार्वेकर यांच्यातील हुशारी, संवाद कौशल्य या गुणांमुळे मिलिंद नार्वेकरांची उद्धव ठाकरेंच्या पीएपदी निवड झाली. तेव्हापासून ते आजतागायत नार्वेकर हे अनेक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहेत.

(Will bitterness between Governor Bhagat Singh Koshyari and CM Uddhav Thackeray bitterness to end after Mediated by Milind Narvekar? )

संबंधित बातम्या 

आधी अपक्ष आमदाराला विशेष विमानाने मुंबईत आणलं, आता थेट शिवसेनेत प्रवेश, मिलिंद नार्वेकरांनी करुन दाखवलं

 निलेश लंकेंनी राष्ट्रवादीत आणलं, मिलिंद नार्वेकरांनी ‘करुन दाखवलं’, पारनेरच्या नगरसेवकांची घरवापसी