Special story | देशात हलकल्लोळ, 29 गोळ्या झाडून इंदिरा गांधी यांची हत्या, त्याच दिवशी पंतप्रधानपदाचा पेच कसा सुटला?, वाचा इन्साईड स्टोरी

इंदिरा यांच्यावर तब्बल 29 गोळ्या झाडण्यात आल्यामुळे त्यांच्या देहाची चाळण झाली होती. नंतर एम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. इंदिरा यांची हत्या झाल्यामुळे त्यावेळी संपूर्ण देश हादरला होता. देशाच्या पंतप्रधानाचीच हत्या झाल्यामुळे आता पुढे काय होणार ? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

Special story | देशात हलकल्लोळ, 29 गोळ्या झाडून इंदिरा गांधी यांची हत्या, त्याच दिवशी पंतप्रधानपदाचा पेच कसा सुटला?, वाचा इन्साईड स्टोरी
indira gandhi rajiv gandhi


मुंबई : देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) म्हणजेच धाडस ! त्यांची आज म्हणजेच 31 ऑक्टोबर 1984 रोजी क्रूरपणे हत्या झाली. इंदिरा यांच्या बिआन्तसिंग आणि सतनामसिंग या दोन अंगरक्षकांनीच त्यांच्यावर धाड धाड गोळ्या झाडल्या. काही सेकंदात इंदिरा यांच्यावर तब्बल 29 गोळ्या झाडण्यात आल्यामुळे त्यांच्या देहाची चाळण झाली होती. नंतर एम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. इंदिरा यांची हत्या झाल्यामुळे त्यावेळी संपूर्ण देश हादरला होता. देशाच्या पंतप्रधानाचीच अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे आता पुढे काय होणार ? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. इंदिरा यांच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी त्यांचा मुलगा राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. राजीव यांची पंतप्रधानपदी निवड कशी झाली ? तो घटनाक्रम कसा होता ? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं ? जाणून घेऊयात हा घटनाक्रम….

सकाळी इंदिरा गांधींची हत्या, देहाची चाळण

देशाच्या पंतप्रधान म्हणजेच इंदिरा गांधी यांच्यावर 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.16 वाजता दोन अंगरक्षकांनीच हल्ला केला. दोघांनीही इंदिरा यांच्यावर तब्बल 29 गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यानंतर इंदिरा रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या अंगावरची साडी रक्ताने पूर्णपणे भिजली होती. नंतर पुढच्या सोळा मिनिटात म्हणजेच 9.32 वाजता त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. फुप्फुस, यकृत, मणका अशा सर्व अवयवांमध्ये गोळ्या घुसल्याने दुपारी 2.20 वाजता त्यांची प्राणज्योत मालवल्याचं जाहीर करण्यात आलं. इंदिरा यांची हत्या देशवासीयांना हादरवून सोडणारी होती.

indira gandhi

हल्ल्यानंतर इंदिरा रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या अंगावरची साडी रक्ताने पूर्णपणे भिजली होती.

देशात अस्थिरता, पंतप्रधानपदासाठी नव्या नावाचा शोध

इंदिरा यांच्या मृत्यूनंतर आता देशाचं काय होणार ? हा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यांच्या हत्येनंतर देशात दंगली उसळण्याची दाट शक्यता होती. देशात तणावपूर्ण वातावरण होतं. याच कारणामुळे देशाला एक धडाडीचा आणि प्रबळ निर्णयक्षमता असणारा पंतप्रधान मिळणं गरजेचं होतं. त्यासाठी इंदिरा यांची जागा घेणारा पुढचा नेता कोण यावर चर्चा केली जात होती. काँग्रेसचे केंद्रीय पातळीवरचे नेते नव्या पंतप्रधानाचा शोध घेत होते. इंदिरा यांच्या मृत्यूनंतर सध्या हंगामी पंतप्रधान नेमावा की देशाला कायस्वरुपी पंतप्रधान हवा यावर चर्चा होऊ लागली. विशेष म्हणजे इंदिरा गांधी यांचा मृतदेह जेथे ठेवला होता, त्याच रुग्णालयात देशाच्या नव्या पंतप्रधानाविषयी चर्चा होऊ लागली.

हंगामी नेतृत्व की कायमस्वरुपी पंतप्रधान

इंदिरा यांची हत्या झाली त्यावेळी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते दिल्लीमध्ये नव्हते. राजीव गांधी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. देशाचे तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग विदेशात तर अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, गृहमंत्री नरसिंह राव असे बडे नेते दिल्लीबाहेर होते. निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडणारे नेते दिल्लीमध्ये नसल्यामुळे पेच जास्तच वाढला होता. पंतप्रधानांचा मृत्यू झाल्यामुळे देशात मोठी पोकळी निर्माण झाली होती. तसेच मंत्रिमंडळाकडेही कायदेशीर अधिकार राहिले नव्हते. या सर्व कारणामुळे हंगामी पंतप्रधानाची नेमणूक करावी, अशा आशयाची चर्चा नेत्यांमध्ये होऊ लागली. काँग्रेसच्या मंत्रिमंडळात गुलझारीलाल नंदा हे सर्वात ज्येष्ठ नेते होते. तसेच यापूर्वी दोन पंतप्रधानांचे निधन झाल्यानंतर त्यांनी हंगामी पंतप्रधान म्हणून देशाचा कारभार पाहिला होता. तर दुसरीकडे शिष्टाचारानुसार अनौपचारिकरित्या प्रणव मुखर्जी हे मंत्रिमंडळात सर्वात ज्येष्ठ होते. या दोघांच्या नावांची हंगामी पंतप्रधानपदासाठी चर्चा होत होती.

indira gandhi rajiv gandhi

इंदिरा गांधी यांच्या मृत्यूमुळे मोठी पोकळी निर्माण झाली होती. पंतप्रधानपदी कोणाला निवडावे यावर विचार केला जात होता.

पंतप्रधानपदासाठी राजीव गांधी योग्य  

तर दुसरीकडे काही नेत्यांना हंगामी पंतप्रधान नको; तर राजीव गांधी यांचीच पंतप्रधान म्हणून निवड करावी असे वाटत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नारायणदत्त तिवारी, राजस्थानचे मुख्यमंत्री शिवचरण माथुर, हरियाणाचे मुख्यमंत्री भजनलाल, ओडिशाचे मुख्यमंत्री जानकी वल्लभ पटनाईक यांचा हंगामी पंतप्रधान निवडण्याला विरोध होता. काही केंद्रीय मंत्री आणि वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. याच कारणामुळे राजीव गांधी दिल्लीला आल्यावरच पंतप्रधानपदाचा निर्णय घ्यायचं ठरवण्यात आलं.

राजीव गांधींच्या नावाला मुखर्जींची संमती

इंदिरा गांधींची हत्या झाली त्याच दिवशी देशाचे गृहमंत्री नरसिंह राव हैदराबादून थेट दिल्लीला आले. एम्स रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पंतप्रधानपदाविषयीच्या चर्चेची माहिती त्यांना देण्यात आली. त्यांनी राजीव गांधी यांच्याकडेच देशाचा कारभार सोपवणे इष्ट असेल असं मत व्यक्त केलं. हंगामी पंतप्रधानाची गरज नाही, या प्रस्तावाला प्रणव मुखर्जी यांनीदेखील तत्काळ सहमती दर्शवली. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर केवळ मलाच हंगामी पंतप्रधान करावे असे मत प्रणव मुखर्जी यांचे होते, असा दावा केला जातो. पण या दाव्याला इंदिरा गांधी यांचे मुख्य सचिव पी.सी. अलेक्झांडर यांनी फेटाळून लावलेले आहे. प्रणव मुखर्जी यांनी अशी कोणतीही मागणी केलेली नव्हती. उलट राजीव गांधी यांच्या नावाला मुखर्जी यांनी उत्स्फूर्तपणे समंती दिली होती, असे अलेक्झांडर यांनी इंदिरा अंतिम पर्व या आपल्या पुस्तकात सांगितलेले आहे.

rajiv gandhi

राजीव गांधी यांच्याकडेच देशाचा कारभार सोपवणे इष्ट असेल असं नरसिंह राव म्हणाले.

सोनिया गांधींच्या डोळ्यात अश्रू, म्हणाल्या पंतप्रधानपद नको

राजीव गांधी यांनीच पंतप्रधान व्हावं यावर सर्व काँग्रेस नेत्याचं एकमत झालं होतं. आता निर्णय राजीव गांधी यांना घ्यायचा होता. त्यांनीही या जबाबदारीसाठी अप्रत्यक्षरित्या होकार दिला होता. मात्र राजीव यांच्या पत्नी सोनिया गांधी यांनी त्याला विरोध केला होता. पंतप्रधानपदी असलेल्या आपल्या सासूची म्हणजेच इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यामुळे त्या आधीच घाबरलेल्या होत्या. त्यानंतर याच पदाची जबाबदारी आपल्या पतीकडे येत असल्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या होत्या. एम्स रुग्णालयातील एका खोलीत राजीव आणि सोनिया यांच्यात पंतप्रधानपदाविषयी संवाद झाला होता. सोनिया गांधी रडत होत्या. राजीव यांना त्यांनी घट्ट धरलेलं होतं. तसेच “तुम्ही पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारु नका” असं त्या राजीव यांना सांगत होत्या. तर दुसरीकडे सध्या देशात मोठा पेचप्रसंग उभा ठाकला आहे. अशा वेळी मला ही जबादारी स्वीकारणं गरजेचं आहे, अशा शब्दात राजीव सोनिया यांना समजावून सांगत होते. या संभाषणाचे साक्षीदार पी.सी. अलेक्झांडर होते. या प्रसंगाचे वर्णन त्यांनी इंदिरा अंतिम पर्व या पुस्तकात केलेले आहे.

RAJIV GANDHI AND SONIA GANDHI

पंतप्रधानपद स्वीकारु नका असं सोनिया गांधी राजीव यांना सांगत होत्या.

शपथविधीचा पेच  

देशाच्या पंतप्रधानपदी कोण हा प्रश्न आता मागे पडला होता. त्यासाठी राजीव गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं. मात्र शपथविधीचा प्रश्न गंभीर होऊन बसला होता. कारण पंतप्रधानपदाची शपथ राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत होते. राष्ट्रपतींकडूनच पंतप्रधानपदाची शपथ दिली जाते. मात्र तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग विदेशात होते. त्यांचे विमान दिल्लीकडे निघाले होते. पण अजूनतरी ते देशात आले नव्हते. याच कारणामुळे झैलसिंग यांची वाट न पाहता उपराष्ट्रपतींच्या हस्ते राजीव यांचा शपथविधी उरकून घ्यावा. असे काही नेत्यांचे मत होते. पंजाबमधील ऑपरेशन ब्लू स्टारमुळे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग आणि इंदिरा गांधी यांच्यात काही मतभेद निर्माण होते. यामुळे झैलसिंग राजीव यांना शपथ द्यायला तयार होणार नाहीत. परंपरेला धरून मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ मंत्र्याला हंगामी पंतप्रधानाची शपथ देण्याचा ते आग्रह धरतील, असं काही नेत्यांना वाटत होतं. याच कारणामुळे राष्ट्रपती विदेशात आहेत तोपर्यंत राजीव यांचा शपथविधी उरकून टाकावा असं म्हटलं जाऊ लागलं.

देशात दंगल भडकली, अस्थिरता निर्माण होऊ शकते

राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपती राष्ट्रपतीपदाची जबाबदारी पार पाडू शकतात. झैलसिंग दिल्लीमध्ये नसले तरी त्यांचे विमान भारतीय हवाईक्षेत्रात आले होते. त्यामुळे राष्ट्रपती देशात असूनदेखील राजीव यांचा शपथविधी उपराष्ट्रपती यांच्या हस्ते पार पडला असता तर घटनात्मक पेच उभा राहिला असता. तसेच हा शपथविधी म्हणजे आपल्या अधिकारांना दिलेलं आव्हान आहे; असा गैरसमज झैलसिंग यांचा झाला असता. पुढे ते शपथेच्या वैधतेलाच आव्हान देऊ शकले असते. हे गृहितक सत्यात उतरलं तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यात संघर्ष पेटला असता. तसेच इंदिरा यांच्या मृत्यूनंतर देशात दंगली भडकलेल्या असताना हा नवा वाद अस्थिरता निर्माण करु शकला असता. याच कारणामुळे इंदिरा यांचे सचिव पी.सी. अलेक्झांरड तसेच तत्कालीन कायदामंत्री शिवशंकर यांनी राजीव यांचा शपथविधी उपराष्ट्रपती यांच्या हस्ते पार पाडण्याच्या प्रस्तावाला विरोध केला.

rajiv gandhi

राष्ट्रपती देशात असूनदेखील राजीव यांचा शपथविधी उपराष्ट्रपती यांच्या हस्ते पार पडला असता तर घटनात्मक पेच उभा राहिला असता.

शेवटी शपथविधी राष्ट्रपतींच्या उपस्थितीतच

या सर्व पेचप्रसंगांची माहिती राजीव गांधी यांना देण्यात आली. त्यांनी राष्ट्रपती देशात येईपर्यंत थांबण योग्य होईल असं सांगितलं. राजीव यांच्या निर्णयानंतर शपथविधीच्या सर्व औपचारिकतेची तयारी करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राजीव यांची पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. तसेच सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रपतींना शिफारस करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळातील सर्व नेत्यांनी राष्ट्रपती भवनात सायंकाळी सहा वाजता हजर राहावं असं राजीव यांनी सांगितलं. राष्ट्रपती भवनातील अशोका हॉलमध्ये सर्व नेते जमलेले होते. पण नियोजित वेळेच्या 40 मिनिटे उशिराने नियोजित पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती अशोका हॉलमध्ये दाखल झाले होते. नंतर शपथविधी दहा मिनिटांच्या आत आटोपण्यात आला होता. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.

राष्ट्रपतीभवनात राजीव गांधी यांचा शपथविधी पार पडला. (फोटो @INCinHistory)

पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर राजीव गांधी

दरम्यान, राजीव यांच्या हातात देशाची सत्ता आली असली तरी इंदिरा यांच्या हत्येमुळे सगळीकडे दंगली उसळल्या होत्या. शीख धर्मियांची घरे जाळली जाऊ लागली. त्यांची हत्या केली जाऊ लागली. हा पेचप्रशंग नंतर राजीव यांनी मोठ्या खुबीने हाताळला होता. इंदिरा यांच्यासारखेच धाडस बाळगून राजीव यांनी पुढे देशाचा कारभार पाहिला होता.

इतर बातम्या :

Special Story | पाऊस अन् सोसाट्याचा वारा, हत्तीवर बसून ‘बेलची’ला निघाल्या, इंदिरा गांधींचा असा दौरा ज्याने राजकारण बदलून टाकलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI