लग्न करताना स्त्री आणि पुरुषाच्या वयात किती अंतर असणं गरजेचं? आचार्य चाणक्य म्हणतात

लग्न ठरवताने अनेक गोष्टी पाहिल्या जातात, मुलगी - मुलगा काय करतो, कुटुंब कसं आहे, कुठे राहतो... असे अनेक प्रश्न एकमेकांना विचारले जातात. पण एक गोष्ट अधिक महत्त्वाची असते आणि ती म्हणजे दोघांमध्ये वयाचं किती अंतर आहे.. तर मुलगी आणि मुलाच्या वयात किती अंतर असलं पाहिजे? यावर आचार्य चाणक्य यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

लग्न करताना स्त्री आणि पुरुषाच्या वयात किती अंतर असणं गरजेचं? आचार्य चाणक्य म्हणतात
| Updated on: Jun 22, 2026 | 2:42 PM

लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते. घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणतात, लग्न योग्य वयातच झालेलं चांगलं असतं. पण दोघांमध्ये वयाचं अंतर किती पाहिजे, याबद्दल आचार्य चाणक्य यांनी मोलाचा सल्ला चाणक्य नीतिमध्ये दिला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लग्नासाठी जात, धर्म, वयातील अंतर महत्त्वाचं नसतं. अनेक लोक म्हणतात की, स्त्री आणि पुरुषामधील प्रेम, सामंजस्य आणि विश्वास पुरेसा असतो. पण चाणक्यांच्या मते, सुंदर वैवाहिक जीवनासाठी जसं प्रेम आणि विश्वास महत्त्वाचं आहेत, तसंच वयातील अंतर देखील नात्याची दिशा ठरवतं. पती-पत्नीमधील वयाचा फरक खूप जास्त नसावा. विवाह हा मानसिक, भावनिक आणि शारीरिक संतुलनाचा प्रश्न आहे आणि वयातील मोठं अंतर हे संतुलन बिघडवू शकतं. तर जाणून घ्या पती-पत्नी होणाऱ्या मुला-मुलीमध्ये वयाचा फरक किती असावा.

आचार्य चाणक्यांच्या मते, पती पत्नीपेक्षा वयाने मोठा असावा, जेणेकरून तो आपल्या अनुभवाने, संयमाने आणि परिपक्वतेने कौटुंबिक जीवन सांभाळू शकेल. परंतु त्यांनी असं देखील सांगितलं आहे की, पती-पत्नीमधील वयाचं अंतर खूप जास्त नसावं. पती-पत्नीमधील नातं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. जर पती-पत्नीमधील वयाचं अंतर खूप जास्त असेल, तर त्यामुळे वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. चाणक्याच्या मते, पुरुषाने आपल्यापेक्षा खूप लहान असलेल्या स्त्रीशी लग्न करणं योग्य नाही. कारण अशी लग्नं फार काळ टिकत नाहीत. त्यामुळे, लग्न करणाऱ्या स्त्री आणि पुरुषाच्या वयात 3 ते 5 वर्षांचं अंतर असणं पुरेसं आहे.

नात्यासाठी वयातील मोठं अंतर धोकादायक

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये असं देखील म्हटलं आहे की, पती-पत्नीमधील वयाचं अंतर जितके कमी असेल तितके चांगले. 3 ते 5वर्षांचे अंतर दोघांसाठी योग्य मानलं जातं. पती-पत्नीमधील वयाचं अंतर जितकं कमी असेल, तितकी त्यांच्यातील जुळवणूक आणि समजूतदारपणा अधिक असतो, ते एकत्र चुका करतात, एकत्र आनंदी जीवन जगतात आणि कौटुंबिक जीवनातील साध्या गोष्टी एकत्र शिकतात.

त्याचप्रमाणे, त्यांच्या आवडीनिवडी, विचार आणि जीवनशैली समान असतात. जर वयाचं अंतर खूप जास्त असेल, तर पती-पत्नीची मानसिकता देखील भिन्न असते. विचारांमधील हे फरक, जीवनाकडे पाहण्याचा भिन्न दृष्टिकोन अनेकदा मतभेद आणि भांडणांना कारणीभूत ठरू शकतात. यामुळे नातेसंबंध कमकुवत होतात आणि घटस्फोटापर्यंत नातं पोहोचू शकतं.

Follow Us