
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी स्वभावाच्या विविध पैलूंवर विस्तृत लिखाण केलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाच्या स्वभावात अशा काही गोष्टी असतात ज्या गोष्टी पुढे चालून त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरतात. त्यामुळे वेळीच या गोष्टी लक्षात घेऊन त्याचा त्याग करणं हेच मानवी जीवनाच्या दृष्टीने हिताचं असतं. अनेकांच्या बाबतीमध्ये असं देखील होतं, की त्यांना आपल्या स्वभावातील कोणत्या गोष्टी प्रगतीसाठी अडथळा ठरत आहेत, हे त्यांच्या लक्षात येतं. मात्र तिथे आळस अडवा येतो, आणि असे व्यक्ती या गोष्टी दूर करण्यासाठी कोणताही प्रयत्न करत नाहीत, परिणामी अशा सवयींचा त्यांना त्यांच्या आयुष्यात मोठा फटका बसतो, त्यांचं मोठं नुकसान होतं. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
सत्य बोलणं – चाणक्य म्हणतात अनेकदा काही ठिकाणी सत्य बोलण्याची भीती आपल्याला वाटत असते, तर काही जणांना कायम खोट बोलण्याची सवय असते. मात्र हीच सवय तुमच्या प्रगतीला मारक ठरते. त्यामुळे जर तुम्हालाही खोटं बोलण्याची सवय असेल तर आजच ती बदला, कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्य बोलण्याची भीती वाटू देऊ नका, कारण तुम्ही जेव्हा वारंवार खोटं बोलता, आणि जेव्हा ते समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येतं, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये समोरच्या व्यक्तीचा विश्वास तुमच्यावरून कमी होऊ लागतो, त्यामुळे नेहमी खरं तेच बोलावं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
बदललेली परिस्थिती – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात एकच परिस्थिती कायम बसून राहत नसते, कधी सुखाचे दिवस येतात, कधी दु:खाचे अशा परिस्थितीमध्ये माणसानं घाबरून जाऊ नये, स्थिर रहावं. कारण प्रत्येक दिवस हा बदलणार असतो, हे लक्षात ठेवा.
संघर्ष – चाणक्य म्हणतात संघर्ष हा मानवाच्या आयुष्यात कायम असतोच, संघर्षाशिवाय या जीवनाची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाहीत. त्यामुळे तुमच्या मनातून सर्वात आधी संघर्षाची भीती कमी करा, आपल्याला आपल्या आयुष्यात संघर्ष करायचाच आहे, हे मनाशी ठरवून घ्या, तुमच्या आयुष्याचा प्रवास अधिक सोपा होईल.
कष्ट – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाशिवाय काहीही मिळत नाही. तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढं यश तुम्हाला मिळेल, तुमची प्रगती होईल, त्यामुळे कधीही कष्टाला घाबरू नका, कष्ट करण्याची तयारी ठेवा, यश तुमचं असेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)