अंगारकीनिमित्त गणपती मंदिरं सजली!

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:33 AM, 25 Dec 2018
अंगारकीनिमित्त गणपती मंदिरं सजली!

मुंबई : आज वर्षातील शेवटची अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. या निमित्ताने मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात, रत्नागिरीमधील गणपतीपुळे मंदिरात आणि पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात काल रात्रीपासून भाविकांनी रांगा लावल्या आहेत. विशेष म्हणजे, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 6 हजार फुलांनी मंदिराची सजवाट केली आहे. तर, रत्नागिरीमध्ये तीन लाख भाविक दर्शनासाठी येणार असल्याचे सांगितलं जात आहे. वर्षातील शेवटची अंगारकी चतुर्थी असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त बप्पाच्या दर्शनासाठी मुंबई आणि पुण्यात दाखल झाले आहेत. तर रात्री 3 वाजता सिद्धिविनायक मंदिरात काकड आरतीही करण्यात आली.

सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. संकष्टी चतुर्थी निमित्ताने येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. तसेच पुण्यातील दगडूशेठ हलवाई येथेही काल रात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. विशेष म्हणजे दगडूशेठ हलवाई मंदिरात अंगारकीनिमित्त ट्रस्टच्यावतीने मंदिराला फुलांची आरास करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 6 हजार किलो फुले वापरण्यात आली आहे. झेंडू ,शेवंती आणि गुलाब या फुलांचा समावेश या सजावटीत आहे. फुलांची आकर्षक आणि मनमोहक सजावट मंदिरावर आणि मंदिरात करण्यात आली आहे. यावेळी प्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर यांनी श्रींच्या चरणी गुणकाला राग सादर करून स्वराभिषेक केला.

अंगारकी चतुर्थी म्हणजे काय?

भारतीय कालगणनेनुसार कृष्ण पक्षातील चौथा दिवस म्हणजे चौथी तिथी मंगळवारी आली तर त्या तिथीला अंगरीकी चतुर्थी असे संबोधले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी महत्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते.

मुदगल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगरक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करुन गणपतीला प्रसन्न करुन घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव “अंगारक” हे लोकस्मरणात राहील आणि हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. तसेच या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही किंवा संकट निवारण होते, अशी भाविकांची धारणा आहे.