वाशिमची चामुंडा देवीची मूर्ती बघितली का?, भाविकांची मोठी गर्दी

| Updated on: Sep 29, 2022 | 4:58 PM

चामुंडा, बालाजी व नालसाहेब अशा तीन मूर्ती मिळाल्या. त्यापैकी एक ही चामुंडा देवी असल्याचं सांगितलं जातंय.

वाशिमची चामुंडा देवीची मूर्ती बघितली का?, भाविकांची मोठी गर्दी
चामुंडा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Image Credit source: t v 9
Follow us on

विठ्ठल देशमुख, Tv9 मराठी प्रतिनिधी, वाशिम : वाशिमसह राज्यातील लाखो भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या चामुंडा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. वाशिमच्या चामुंडा देवीचा वत्सगुल्म या प्राचीन पुराणात उल्लेख आहे. चंड-मुंड या राक्षसाचा वध करण्याकरिता वाशिममध्ये म्हणजेच तेव्हाच्या वत्सगुल्म नगरीत ही देवी प्रकट झाल्याची आख्यायिका आहे. वाशिम शहराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. इतिहासात राजे वाकाटक घराण्याची राजधानी म्हणून या वत्सगुल्म नगरीची ओळख आहे. आजही उत्खननात पुरातन वस्तू आढळतात.

वाशिम शहरात उत्खनन झालं. तेव्हा चामुंडा, बालाजी व नालसाहेब अशा तीन मूर्ती मिळाल्या. त्यापैकी एक ही चामुंडा देवी असल्याचं सांगितलं जातंय. या देवीचे वानखेडे हे पुजारी चारशे वर्षापूर्वी तुळजापूर येथून वत्सगुल्म अर्थात आजच्या वाशिममध्ये आले होते.

बालाजी-चामुंडा देवीचं नातं काय?

आजसुद्धा त्याच परिवारातील पुजारी देवीची पूजा अर्चना करतात. बालाजी व चामुंडा देवीचं भाऊ-बहिणीचं नातं आहे. अष्टमीला बालाजीकडून साडी-चोळी बहीण चामुंडा देवीला येते.

दसऱ्याच्या दिवशी बालाजी व चामुंडा देवी या भाऊ बहिणीची पालखी सीमोल्लंघनाला सोबत जात असते. असा हा दुर्मिळ योग्य अनुभवण्यासाठी अनेक भाविक मोठी गर्दी करतात.

दहा फूट खोल गाभाऱ्यात मूर्ती

वाशिमचं ग्रामदैवत असलेल्या चामुंडा देवीची दहा फूट खोल गाभाऱ्यात मूर्ती स्थापना केलेली आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या देवीप्रमाणे कार्तिक महिन्यात पायापासून ते कपाळापर्यंत सूर्याची किरणे देवीवर पडतात. याचा अनुभव व दर्शन घेण्यासाठी भक्त इथे येत असतात.

चामुंडा देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे. भक्ताच्या सुख दुःखात नेहमी सहभागी राहते. मनोकामना पूर्ण होऊन मनाला शांती लाभत असल्याचे देवीचे भक्त सांगतात.