
दिवाळीचा उत्साह फक्त भारतातच नाही तर जगभरात सुरू आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी भारतीय माणूस आहे, त्या ठिकाणी दिवाळीचा मोठा जल्लोष सुरू आहे. न्यूझीलंडमध्येही दिवाळीचा असाच जल्लोष पाहायला मिळाला आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी वेलिंग्टनच्या बीएपीएस मंदिरात दिवाळी साजरी केली. यावेळी अन्नकूट उत्सवही साजरा करण्यात आला. याप्रसंगी त्यांच्यासोबत अन्य प्रतिनिधीही उपस्थित होते. तसेच शेकडो हिंदू नागरिकही या उत्सवात सामील झाले होते.
दिवाळीनिमित्ताने आयोजित या कार्यक्रमात श्री स्वामीनारायण मंदिर BAPSमध्ये लक्सन यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. लक्सन यांनी ट्विटर अकाऊंटवरून सत्काराबाबत सर्वांचे आभारही मानले आहेत. तसेच सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिर, वेलिंग्टनमधील सर्वांचे खूप खूप धन्यवाद. माझं अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आलं. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा, असं लक्सन यांनी संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, मंदिराचे महंत स्वामी महाराजांनी एक पत्र पाठवून पंतप्रधान लक्सन यांना दिवाळी निमित्ताने आशीर्वाद पाठवले आहेत. न्यूझीलंडच्या सर्व लोकांना शांती, समृद्धी आणि एकतेबाबतच्या सदिच्छा महंत स्वामी महाराजांनी दिल्या आहेत. तसेच हे नवीन वर्ष सर्वांना शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक पूर्तीचं जाओ, अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.
हिंदू कॅलेंडरनुसार नव्या वर्षाची सुरुवात आणि अन्नकूट पर्वाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. अन्नकूटचा अर्थ खाद्यपदार्थांचा डोंगर. यात अनेक प्रकारच्या पदार्थांचा देवाला भोग दिला जातो. समाजात एकता, शांती आणि समृद्धीची कामना करण्याचा या पर्वामागचा उद्देश आहे.
पंतप्रधान लक्सन यांनी स्वत: अन्नकूटसाठी एक भेट तयार केली. तसेच नवीन वर्षानिमित्ताने आरतीही म्हटली. याशिवाय तरुणांनी आयोजित केलेल्या एका प्रदर्शनातही त्यांनी भाग घेतला. या प्रदर्शनात हिंदू धर्म, संस्कृती आणि परंपरेला प्रदर्शित करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी लक्सन यांना हिंदू धर्माचे वैशिष्ट्ये आणि आयाम समजावून सांगितले.
अशा प्रकारचा उत्सव केवळ धार्मिक महत्त्व अधोरेखित करत नाही, तर विविधता आणि बहुविविधतेचं प्रदर्शन घडवत असतो. समाजातील तरुणांनी या उत्सवात भाग घेतला हे चांगलं लक्षण असून मी त्यांचे आभार मानतो, असंही ते म्हणाले. मंदिरात असताना पंतप्रधानांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक समुदाय सदस्यांशी संवाद साधला, त्यांच्या कथा ऐकल्या आणि दिवाळी व अन्नकूट या दुहेरी सणाच्या आनंदात सहभागी झाले.
पंतप्रधानांनी बीएपीएस समुदायासोबतचे आपले जुने अनुभवही शेअर केले. मार्च 2025 मध्ये दिल्लीत स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर भेटीवेळी तिथे भेटलेल्या स्वयंसेवकांची आठवण काढली. तसेच 2023 मध्ये बीएपीएस ऑकलंड भेटीचा उल्लेख केला. स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरात भेट देणे आणि तिथे जगभरातून आलेल्या स्वयंसेवकांशी संवाद साधणे ही आमच्यासाठी मोठी संधी होती… न्यू दिल्लीला आमच्यासोबत वेळ घालवायला आल्याबद्दल तुमचे आभार, असंही ते म्हणाले.
बीएपीएस स्वयंसेविका प्रिया प्रभू यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी केवळ उपस्थित राहूनच नव्हे, तर पूर्ण उत्सवात भाग घेतला. पहिली आरती केली. शिरोमध्ये स्वतःचा हातभार लावला. लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांशी संवाद साधला. त्यामुळे सणाचा उत्साह आणखी वाढला. पंतप्रधानांसोबत इतर अनेक संसदीय सदस्यही उपस्थित होते. ख्रिस बिशप, लुईस अप्स्टन, तसेच एमपी नॅन्सी लू, कार्लोस चेउंग, रिमा नाख्ले आणि टिम कॉस्टली.
महंत स्वामी महाराज हे भगवान स्वामीनारायणांचे सहावे आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. बीएपीएस स्वामीनारायण संस्था यांचे सध्याचे आध्यात्मिक प्रमुख आहेत. त्यांचे गाढ ज्ञान, विनम्रता आणि करुणा यामुळे ते जगभरातील कोट्यवधी भक्तांसाठी एक मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत.
बीएपीएस (बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था) ही एक जागतिक, आध्यात्मिक आणि स्वयंसेवक-चालित हिंदू संस्था आहे, जी वेदांच्या शिकवणुकीवर आधारित आहे. संस्था वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती आणि सामाजिक भल्यासाठी समर्पित आहे.
1984 मध्ये स्थापन झाल्यापासून, न्यूझीलंडमधील बीएपीएसने ऑकलंड, ख्राइस्टचर्च, रोटोरुआ, हॅमिल्टन आणि आता वेलिंग्टन यासारख्या प्रमुख शहरांमध्ये मंदिरं उभारली आहेत. तसेच अनेक प्रादेशिक केंद्रेही कार्यरत आहेत. ही केंद्रे उपासना, सांस्कृतिक शिक्षण, युवक विकास आणि समुदाय सेवेची केंद्रे म्हणून कार्य करतात. BAPS चॅरिटीजच्या माध्यमातून, संस्था देशभरात अन्नदान मोहीमा, आरोग्य जनजागृती उपक्रम व इतर सेवाभावी कार्य करत असते.