
अनेक लोक आपल्या घराची सजावट करताना मूर्तींचा वापर करतात, आपल्या घरात विविध प्रकारच्या मूर्ती आणि प्रतिमा ठेवतात. आपलं घर सुंदर आणि अधिक आकर्षक दिसावं हा त्या मागचा उद्देश असतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार अशा काही मूर्ती किंवा प्रतिमा आहेत, ज्या घरात ठेवणं शुभ मानलं जात नाही, त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्याचा त्रास तुम्हाला होतो. घरात काही कारण नसताना अचानक वादविवाद होतात. आर्थिक संकटं येतात, प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात, त्यामुळे अशा मूर्ती घरात ठेवू नये, असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात घरात कोणत्या मूर्ती असाव्यात आणि कोणत्या नसाव्यात त्याबद्दल.
घरामध्ये कधीही बुडत असलेल्या नावेची प्रतिमा लावू नये, कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवाहीत होते. व्यवसायामध्ये तोटा होतो, प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरात भांडणं होतात.अचानक आर्थिक संकट येऊ शकतात, तसेच आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होतात, त्यामुळे घरात बुडत असलेल्या नावेची प्रतिमा असू नये असं वास्तुशास्त्र सांगतं. त्याचबरोबर घरात नटराजची मूर्ती देखील नसावी, त्यामुळे घरात कारण नसताना वाद विवाद होतात. कुटुंबातल्या व्यक्तींसोबत भांडणं होतात, घरात शांतता राहात नाही.
घरामध्ये प्रचंड मोठ्या आणि भीतीदायक मूर्ती देखील नसाव्यात, वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात अशा मूर्ती असतील तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. घरातील वातावरण अस्थिर होतं. त्याचसोबत हिंसक प्राणी किंवा पक्ष्यांच्या मूर्ती आणि प्रतिमा देखील घरात नसाव्यात जसं की सिंह, वाघ, घुबड, गिधाड असे प्राणी किंवा पक्ष्यांच्या मूर्ती घरात नसाव्यात ज्याचा परिणाम हा कुटुंबातील सदस्यांच्या मनावर होतो, त्यांचा स्वभाव चिडचिडा बनतो, ते अधिक आक्रमक होतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
घरात कोणत्या मूर्ती असाव्यात?
वास्तुशास्त्रानुसार घरात देवी, देवतांच्या मूर्ती असाव्यात, जसं की भगवान विष्णू, माता लक्ष्मी, गणेश व इतर देवतांच्या मूर्ती किंवा प्रतिमा घरात असाव्यात ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, सोबतच नैसर्गिक दृश्य जसं वाहत असलेला झरा, उगवता सूर्य, धावणारे घोडे, याचसोबत राधा कृष्ण यांच्या प्रतिमा घरात असणं शुभ मानलं गेलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)