
आशिया कप 2025 चा अंतिम सामना आता अगदी जवळ आला आहे. ही स्पर्धा सुरू झाल्यापासूनच विजयी घोडदौड करणारी टीम इंडियाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर आता बांगलादेश आणिपाकिस्तानमध्ये लढत असून तो सामना जिंकणारी टीम फायनलमध्ये पोहोचून टीम इंडियाशी मुकाबला करेल. भारतीय संघ आशिया कपच्या फायनमध्ये पोहोचल्यामुळे चाहते फार खुश असून फायनलची लढत पाहण्यासाठी विविध प्लानही आखले जात आहेत. मात्र असं असलं तरी हा अंतिम सामना आपल्यासाठी फरा सोप ठरेल असं वाटत नाही.
रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये टीम इंडियाचा मुकाबला कोणाशी होतो हे तर आज स्पष्ट होईलच, पण फायनल जिंकून आशिया कपच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी टीम इंडियाला जीव तोडून मेहनत करावी लागणार असून गेल्या काही सामन्यांमध्ये केलेली चूक त्यांना टाळावी लागणार आहे. आशिया कप टी-20० स्पर्धेत, भारताने लीग टप्प्यात तिन्ही विभागांमध्ये चमकदार कामगिरी केली पण सुपर 4 मध्ये पोहोचताच, त्याचे क्षेत्ररक्षण बिघडल्यासारखे वाटले.
पाकिस्तानविरुद्ध सुरू झालेला भारतीय क्षेत्ररक्षकांचा खराब क्षेत्ररक्षणाचा ट्रेंड बांगलादेशविरुद्धही सुरूच राहिला. या आशिया कपमध्ये भारतीय संघाने 12 कॅच सोडले आहेत, जे या स्पर्धेत कोणत्याही संघाने सोडलेले सर्वाधिक कॅच आहेत. आशिया कपच्या इतिहासात समान संख्या असलेले 11 कॅच सोडण्याचा हाँगकाँग आणि चीनच्या संघाचाही विक्रम टीम इंडियाने मागे टाकला आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना या चुकीवर काम करून फिल्डींग सुधारावी लागेल, कारण तसं केलं नाही तर आशिया कप ट्रॉफीची टीम इंडियाच्या हातातून निसटेल.
अंतिम सामन्यात भारताची एक चूक संघासाठी महागात पडू शकते. आशिया कप सुपर फोरच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने पाच झेल सोडले. टीम इंडियाने बांगलादेशवर 41 धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला असला तरी, त्यांची फिल्डींग खूपच निराशाजनक होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भारताने बांगलादेशच्या एका फलंदाजाला चार वेळा जीवदान दिले. भारतीय क्षेत्ररक्षकांनी सैफ हसनचे चार झेल सोडले, त्या सामन्यात सैफने 69 धावा केल्या.
सैफला इतक्यांदा मिळालं जीवदान
भारत विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामन्यात, अक्षर पटेलने पहिल्यांदा सैफ हसनचा कॅच सोडला तेव्हा तो 40 धावांवर होता. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने सैफला आणखी दोन वेळा जीवदान दिले. एवढंच नव्हे तर त्यानंतर तो65 धावांवर खेलत असताना शिवम दुबेने तर 66 धावांवर खेळत असताना यष्टीरक्षक संजू सॅमसनने कॅच सोडत त्याला त्याला जीवनदान दिले. अभिषेक शर्माने 67 धावांवर झेल सोडला, तर कुलदीप यादवने शेवटच्या क्षणी नसुम अहमदचा झेल सोडला. त्यामुळे भारताने अतिशय गचाळ फिल्डींग करत 5 कॅचेस सोडले.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही अनेकदा सोडले कॅच
तसेच यापूर्वी, सुपर फोरमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध पाच झेल सोडले होते. त्या सामन्यात भारताने रनआउटची एक संधीही गमावली होती. भारताने पाकिस्तानला सहा संधी दिल्या होत्या. पण आता अंतिम सामन्यात पोहोटचून भारताला अशा चुका करता येणार नाही अन्यथा त्यांना ट्रॉफी गमवावी लागू शकते. अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाला आपले क्षेत्ररक्षण सुधारावे लागेल नाहीतर अंतिम सामन्यातील एक छोटीशी चूक त्यांना जेतेपदापासून दूर नेऊ शकते. अंतिम फेरीत भारताचा सामना बांगलादेश किंवा पाकिस्तानशी होऊ शकतो. हे दोन्ही संघ आज आमनेसामने येतील, हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करत भारताशी लढेल तर आज पराभूत झालेला संघ स्पर्धेबाहेर पडेल.