
आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा होण्यापूर्वीच अनेक खेळाडूंच्या नावांची चर्चा सुरू आहे. यामध्ये स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे नाव देखील समाविष्ट आहे, तो इंग्लंड दौऱ्यावर त्याच्या फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंटमुळे सतत वादात होता. इंग्लंडमध्ये फक्त 3 कसोटी सामने खेळल्यामुळे, बुमराहला आशिया कपमधूनही विश्रांती दिली जाऊ शकते असे मानले जात होते मात्र निवड समितीचा हेतू वेगळा असल्याचे दिसते. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये बुमराह टीम इंडियाचा भाग असेल असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
आशिया कप खेळणार बुमराह
आशिया कप 2025 हा संयुक्त अरब अमिरातीमध्ये 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणार आहे, मात्र त्यासाठी टीम इंडियाची अद्याप निवड झालेली नाही. अशा परिस्थितीत, शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या संघात स्थान मिळवू शकतील की नाही यावर सतत चर्चा सुरू असताना, जसप्रीत बुमराहबद्दलही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचं एक मोठं कारण म्हणजे बुमराहचे वर्कलोड मॅनेजमेंट, ज्यावर अलीकडेच इंग्लंड दौऱ्यात प्रचंड टीका झाली होती.
पण पीटीआयच्या वृत्तानुसार, निवड समिती ही बुमराहला स्पर्धेत पाठवण्याच्या बाजूने आहे. याचं एक मोठं कारण म्हणजे आशिया कपचं स्वरूप. पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषक लक्षात घेऊन, यावेळी ही स्पर्धा फक्त टी20 स्वरूपात खेळवली जाईल. तसेच, टीम इंडियाने मागील आशिया कपही जिंकला होता आणि त्यामुळे त्यांना जेतेपदाचे रक्षण करावे लागणार आहे. त्यामुळे, लहान फॉरमॅट, त्याचे महत्त्व आणि कमी सामने लक्षात घेता, बुमराहची निवड निश्चित दिसते. तसेच, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बुमराहला सुमारे दीड महिना विश्रांती मिळाली असेल.
या सामन्यात बुमराहला मिळेल विश्रांती
इतकंच नव्हे तर PTIच्या रिपोर्टनुसार, आशिया कप लक्षात ठेऊन वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यात बुमराहला विश्रांती मिळू शकते. आशिया कपचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी होणार आहे, तर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना 2 ऑक्टोबरपासून सुरू होईल. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती 19 ऑगस्टपर्यंत आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा करू शकते. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्यासह सर्व खेळाडूंचे फिटनेस रिपोर्ट कधी मिळतात यावरही ते अवलंबून असेल.