
मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 2nd Test) यांच्यात बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील (Border Gavskar Trophy) दुसरा कसोटी सामना शनिवारी 26 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामना असणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) खेळण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. (australia vs india 2020 2nd test boxing day test match preview)
Happy Boxing Day Eve! The 'G is looking an absolute treat ? #AUSvIND
PS. Merry Christmas, everyone! pic.twitter.com/yG7SOc6WT0
— Cricket Australia (@CricketAus) December 24, 2020
दुसऱ्या डावातील फलंदाजाीदरम्यान टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. यामुळे दुसऱ्या सामन्यात टीम इंडियामध्ये एकूण 4 बदल करण्यात आले आहेत. यामध्ये सलामीवीर पृथ्वी शॉऐवजी शुभमन गिल, विराट कोहलीच्या जागी अष्टपैलू रवींद्र जाडेजा, दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराज तर विकेटकीपर रिद्धीमान साहाच्या जागी रिषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि शुभमन गिल या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंचं या सामन्यानिमित्ताने कसोटी पदार्पण होणार आहे.
टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली भारतात परतला आहे. यामुळे उर्वरित 3 सामन्यांसाठी अजिंक्य रहाणेकेड टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत रहाणेच्या नेतृत्व गुणाचा कस लागणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा 100 वा सामना असणार आहे. तर ऑस्ट्रेलियातील 50 वा सामना असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आतापर्यंत एकूण 99 कसोटी सामने खेळण्यात आले आहेत. या 99 पैकी 43 सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. तर टीम इंडियानेही ऑस्ट्रेलियाचा 28 सामन्यात पराभव केला आहे. तर 27 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.
हा बॉक्सिंग डे कसोटी सामना असणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 8 बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळण्यात आले आहेत. या 8 पैकी 5 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवला आहे. तर 2 सामने हे बरोबरीत सुटले आहेत. टीम इंडियाला केवळ 1 सामनाच जिंकता आला आहे. यामुळे बॉक्सिंग डे आणि एकूणच कसोटी सामन्यांच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ राहिली आहे.
पहिल्या सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतला आहे. त्यात मोहम्मद शमीही दुखापतीमुळे कसोटी मालिकेबाहेर झाला आहे. टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आहे. यामुळे टीम इंडियाला या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान असणार आहे. यामुळे टीम इंडिया या सामन्यात कांगारुंचा कशाप्रकारे सामना करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अशी आहे टीम इंडिया : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा ( उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाचा अंतिम संघ : टीम पेन (कर्णधार), मॅथ्यू वेड (विकेटकीपर), जो बर्न्स, मारनस लबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिंस, मिचेल स्टार्क, नॅथन लॉयन आणि जोश हेझलवूड
संबंधित बातम्या :
Boxing Day cricket | बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे काय?
(australia vs india 2020 2nd test boxing day test match preview)