IND vs NAM : बुमराहने घातक यॉर्कर चुकीच्या ठिकाणी टाकला, वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडिया टेन्शनमध्ये

IND vs NAM : जसप्रीत बुमराह हा घातक यॉर्कर चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो. आज टीम इंडिया वर्ल्ड कपमधील दुसरा सामना नामिबिया विरुद्ध खेळणार आहे. पण त्याआधी संपूर्ण टीमची चिंता वाढवणारी एक घटना घडली आहे. टीम इंडियाने USA विरुद्ध सलामीचा सामना जिंकला आहे.

IND vs NAM : बुमराहने घातक यॉर्कर चुकीच्या ठिकाणी टाकला, वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडिया टेन्शनमध्ये
Jasprit Bumrah
| Updated on: Feb 12, 2026 | 7:44 AM

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाचा आज नामिबिया विरुद्ध सामना आहे. पण त्याआधी एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. टीम इंडियाच्या अडचणी कमी होण्याऐवजी उलट वाढतच चालल्या आहेत. सलग दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप 2026 चा किताब जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरली आहे. पण भारतीय टीममधील खेळाडूंच्या फिटनेसने चिंता वाढवली आहे. कोणाला दुखापत होतेय तर कोण आजारी पडतोय. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर फिट झालेत, तर ओपनर अभिषेक शर्माच्या आजारपणाने चिंता वाढवलीय. आता अभिषेकचा ओपनिंग पार्टनर ईशान किशनबद्दल टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनवेळी ईशानला दुखापत झाली आहे.

अमेरिकेविरुद्ध सलामीचा सामना जिंकून टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आपल्या अभियानाला सुरुवात केली आहे. भारताचा दुसरा सामना आज नामीबिया विरुद्ध आहे. ही मॅच 12 फेब्रुवारीला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. त्याच्या बरोबर एक दिवस आधी ईशान किशनला दुखापत झालीय. बुधवारी संध्याकाळी प्रॅक्टिस सेशन दरम्यान बुमराहचा एक चेंडू ईशान किशनसाठी घातक ठरला. बुमराहचा चेंडू इशानच्या पायाला लागला.

नेट्समधून तो बाहेर पडला

नेट्समध्ये फलंदाजीच्या सरावादरम्यान लेफ्टी बॅट्समन ईशान किशन टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करत होता. यावेळी बुमराहने एक यॉर्कर चेंडू टाकला. ईशानला तो बॉल खेळता आला नाही. चेंडू थेट फलंदाजाच्या पायावर आदळलाय. ईशान वेदनेने विव्हळला. त्याने लगेच प्रॅक्टिस थांबवली व नेट्समधून तो बाहेर पडला. त्यानंतर टीम इंडियाचा फिजियो लगेच तिथे पोहोचला. त्याने ईशानची तपासणी केली. मेडिकल टीम त्याच्या दुखापतीची तीव्रता जाणून घेत होती, त्यावेळी ईशानला खूप त्रास होत होता.

ओपनिंग जोडीचा प्रश्न निर्माण होईल

रिपोर्ट्सनुसार काहीवेळात ईशान पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला व नेट्समध्ये फलंदाजीसाठी आला, तेव्हा टीम इंडियाने सुटकेचा निश्वास सोडला. फलंदाजीसाठी परतल्यानंतर ईशान त्रासामध्ये दिसत होता. पण त्याने फलंदाजी सुरु ठेवली. आता ही दुखापत किती गंभीर आहे, त्याचा भारत विरुद्ध नामीबिया सामन्यावर किती परिणाम होईल? या बद्दल गुरुवारी संध्याकाळीच समजेल. ईशानला झालेली दुखापत गंभीर असेल, तो या सामन्यात खेळू शकला नाही, तर टीम इंडियासमोर ओपनिंग जोडीचा प्रश्न निर्माण होईल. आधी पोटाचा विकार बळावल्याने अभिषेक शर्माच्या खेळण्याची शक्यता धुसर दिसतेय. अशा परिस्थितीत टीम इंडियाकडे संजू सॅमसनच्या रुपाने एकमेव ओपनर असेल.