कसोटीतील हुकमी एक्का, आता पुजाराचं टी-20 मध्ये तुफानी शतक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

इंदूर : भारतीय संघाचा कसोटीची विश्वासू फलंदाज चेतेश्वर पुजाराने टी-20 मध्येही त्याच्यातील कमाल दाखवून दिली. इंदूरमध्ये खेळवण्यात आलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने सौराष्ट्रकडून खेळताना रेल्वेच्या संघाविरुद्ध वेगवान शतक ठोकलं. संयमी खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुजाराचीही बॅट तळपली आणि त्याने नवा विक्रम नावावर केला. पुजारा सलामीसाठी उतरला होता. 61 चेंडूंच्या त्याच्या डावामध्ये त्याने 14 चौकार आणि […]

कसोटीतील हुकमी एक्का, आता पुजाराचं टी-20 मध्ये तुफानी शतक
Follow us on

इंदूर : भारतीय संघाचा कसोटीची विश्वासू फलंदाज चेतेश्वर पुजाराने टी-20 मध्येही त्याच्यातील कमाल दाखवून दिली. इंदूरमध्ये खेळवण्यात आलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने सौराष्ट्रकडून खेळताना रेल्वेच्या संघाविरुद्ध वेगवान शतक ठोकलं. संयमी खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुजाराचीही बॅट तळपली आणि त्याने नवा विक्रम नावावर केला.

पुजारा सलामीसाठी उतरला होता. 61 चेंडूंच्या त्याच्या डावामध्ये त्याने 14 चौकार आणि एक षटकार ठोकला. टी-20 क्रिकेटमधील पुजाराचं हे पहिलंच शतक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टी-20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पुजारा सौराष्ट्रचा पहिलाच फलंदाज ठरलाय.

प्रथम फलंदाजी करत सौराष्ट्रने या सामन्यात तीन बाद 188 धावा केल्या. पुजाराने देसाईसोबत मिळून 85 धावांची भागीदारी केली आणि 85 धावसंख्येवर देसाई बाद झाला. यानंतर रॉबिन उथप्पासोबत मिळून पुजाराने 82 धावांची भागीदारी रचली. पुजाराने रेल्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने पहिल्या 50 धावा 29 चेंडूत पूर्ण केल्या, तर पुढच्या 50 धावा 32 चेंडूत काढल्या. 163 च्या स्ट्राईक रेटने त्याने हे शतक पूर्ण केलं.

पुजाराच्या नावावर 68 कसोटीत 18 शतक आणि 20 अर्धसतक आहेत. करिअरमध्ये त्याला आतापर्यंत केवळ पाच वन डे सामने खेळता आले आहेत, ज्यामध्ये त्याला केवळ 51 धावा करता आल्या. शिवाय भारतीय संघाकडून त्याला अद्याप एकाही टी-20 मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण आपण सर्व फॉरमॅटसाठी तयार असल्याचं त्याने दाखवून दिलंय.