IND vs HKG: टीम इंडियाचा विजय नेमका कशामुळे? जाणून घ्या विजयाची ‘चार’ कारणं

| Updated on: Sep 01, 2022 | 7:09 AM

IND vs HKG: भारताने आशिया कप 2022 (Asia cup) च्या सुपर फोर गटात प्रवेश केला आहे. भारताने ग्रुप स्टेजच्या आपल्या दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगवर (IND vs HKG) 40 धावांनी विजय मिळवला.

IND vs HKG: टीम इंडियाचा विजय नेमका कशामुळे? जाणून घ्या विजयाची चार कारणं
Suryakumar yadav
Image Credit source: BCCI
Follow us on

मुंबई: भारताने आशिया कप 2022 (Asia cup) च्या सुपर फोर गटात प्रवेश केला आहे. भारताने ग्रुप स्टेजच्या आपल्या दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगवर (IND vs HKG) 40 धावांनी विजय मिळवला. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला (Pakistan) नमवलं होतं. आता दोन्ही सामने जिंकून भारताने पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 ओव्हर्स मध्ये 2 विकेट गमावून 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगच्या टीमने निर्धारीत 20 षटकात 5 विकेट गमावून 152 धावा केल्या. सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या विजयाचा स्टार ठरला. त्याने तुफानी फलंदाजी केली.

भारताचा उपकर्णधार केएल राहुल अजून चाचपडतोय. समोर हाँगकाँग सारखा कच्चा संघ असूनही त्याला वेगाने धावा जमवता आल्या नाहीत. राहुलने 39 चेंडूत 36 धावा केल्या. आवेश खान आणि अर्शदीप सिंहचे महागडे स्पेलही चिंतेचा विषय आहेत. काही गोष्टी अनुकूल न घडूनही भारताने विजय मिळवला. जाणून घेऊया या विजयामागची कारणं.

  1. सूर्यकुमारची स्फोटक फलंदाजी: सूर्यकुमार यादवची धमाकेदार इनिंग भारताच्या विजयाच एक कारण आहे. 13 षटकात 94 धावा अशी भारतीय संघाची या सामन्यात एकवेळ स्थिती होती. पण सूर्यकुमार यादव क्रीझवर येताच सामन्याचा नूर पालटला. सूर्याने फक्त 22 चेंडूत अर्धशतक फटकावलं. त्याने 26 चेंडूत नाबाद 68 धावा फटकावल्या. यात 6 चौकार आणि 6 षटकार आहेत.
  2. कोहली-सूर्याची भागीदारी: भारतीय टीमसाठी सूर्यकुमार शिवाय विराट कोहलीनेही अर्धशतक झळकावलं. सूर्यकुमार प्रमाणे कोहली आक्रमक फटकेबाजी करु शकला नाही. पण सध्या खराब फॉर्म मध्ये असलेल्या विराटचा या इनिंगमुळे आत्मविश्वास नक्तीच वाढेल. कोहली 44 चेंडूत 59 धावांवर नाबाद राहिला. त्याने सूर्यकुमारला चांगली साथ दिली. दोघांनी नाबाद 98 धावांची भागीदारी केली.
  3. पावरप्ले मध्ये विकेट: कुठल्याही टीमला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यासाठी पावरप्ले मध्ये धावगतीला लगाम घालणं आवश्यक असतं. विकेट काढणं महत्त्वाच ठरतं. टीम इंडियाला यात पूर्ण यश मिळालं नाही. पण 6 ओव्हर्स मध्ये 51 धावा देऊन दोन महत्त्वाच्या विकेट मिळवल्या. त्यामुळे हाँगकाँगच्या धावांचा वेग कमी झाला.
  4. जाडेजा-चहलची किफायती गोलंदाजी: खरंतर या सामन्यात हाँगकाँगच्या टीमने क्रिकेट पंडित, प्रेक्षकांचा अंदाज चुकवला. त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त चांगली फलंदाजी केली. त्यांनी बऱ्यापैकी धावा बनवल्या. टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या असत्या. पण रवींद्र जाडेजा आणि युजवेंद्र चहलच्या जोडीने त्यांच्या धावगतीला लगाम घातला. दोघांनी प्रत्येकी 4-4 षटकं गोलंदाजी केली. चहलने 18 धावा दिल्या, जाडेजाने 15 रन्स देऊन 1 विकेट मिळवला.