AFG vs HK : अफगाणिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, हाँगकाँग विरुद्ध कॅप्टन राशीद खानचा निर्णय काय?

Afghanistan vs Hong Kong Toss Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बी ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने आहेत. अफगाणिस्तान या सामन्यात टॉसचा बॉस ठरला आहे. अफगाणिस्तानने या सामन्यात बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

AFG vs HK : अफगाणिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, हाँगकाँग विरुद्ध कॅप्टन राशीद खानचा निर्णय काय?
AFG vs HK Toss Asia Cup 2025
Image Credit source: @ACBofficials X Account
| Updated on: Sep 09, 2025 | 8:16 PM

आशिया कप 2025 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात बी ग्रुपमधील अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग आमनेसामने आहेत. या सामन्यात राशीद खान अफगाणिस्तानचं नेतृत्वात करणार आहे. तर यासिम मुर्तझा याच्याकडे हाँगकाँगच्या कॅप्टन्सीची जबाबदारी आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. उभयसंघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. अफगाणिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार राशिद खान याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता अफगाणिस्तान हाँगकाँगसमोर किती धावांचा डोंगर उभारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

यासिम मुर्तझा काय म्हणाला?

हाँगकाँगचा कर्णधार यासिम मुर्तझा याने टॉस गमावल्यानंतरही आनंद व्यक्त केला. “आम्हाला पहिले बॉलिंग करायची होती. आम्हाला बॉलिंग करण्यात आनंद आहे. आम्ही इथवर (आशिया कप स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी) येण्यासाठी खूप मेहनत घेतली. हाँगकाँग टीमने क्वालिफायरमध्ये चांगला खेळ दाखवला”, यासिमने म्हटलं.

अफगाणिस्तान पाचवा विजय मिळवणार?

अफगाणिस्तान क्रिकेट टीमची टी 20 आशिया कप स्पर्धेतील विजयी टक्केवारी ही 50 आहे. यंदाची टी 20 फॉर्मेटने आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्याची तिसरी वेळ आहे. आतापर्यंत झालेल्या 2 टी 20i आशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तानने एकूण 8 सामने खेळले आहेत. अफगाणिस्तानला त्यापैकी 4 सामने जिंकता आले आहेत. तर अफगाणिस्तानला तितक्याच सामन्यात पराभूत व्हावं लागलं.

हाँगकाँग खातं उघडणार का?

दरम्यान हाँगकाँग टीमला आशिया कप स्पर्धेत आतापर्यंत एकदाही विजयाची चव चाखता आलेली नाही. हाँगकाँगने या स्पर्धेत एकूण 4 सामने खेळले आहेत. हाँगकाँगला या चारही सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे हाँगकाँग अफगाणिस्तानवर मात करत या स्पर्धेच्या इतिहासातील पहिलावहिला विजय मिळवणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : रशीद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्ला अटल, इब्राहिम झाद्रान, गुलबदिन नायब, अझमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, नूर अहमद, एएम गझनफर आणि फजलहक फारुकी.

हाँगकाँग प्लेइंग ईलेव्हन : झीशान अली (विकेटकीपर), बाबर हयात, अंशुमन रथ, कल्हान छल्लू, निजाकत खान, एजाज खान, किंचित शाह, यासीम मुर्तझा (कॅप्टन), आयुष शुक्ला, अतीक इक्बाल आणि एहसान खान.