Asia Cup 2025 : इंडिया-पाकिस्तान सामन्याबाबत ACC चा मोठा निर्णय, नक्की काय?

India vs Pakistan : आशिया कप 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया आणि पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. या संघात साखळी फेरीतील सामना हा 14 सप्टेंबरला नियोजित आहे.या सामन्यावरुन मोठा वाद पाहायला मिळत आहे. त्यात एसीसीने मोठी घोषणा केली आहे. जाणून घ्या

Asia Cup 2025 : इंडिया-पाकिस्तान सामन्याबाबत ACC चा मोठा निर्णय, नक्की काय?
India vs Pakistan Cricket Match
Image Credit source: Alex Davidson-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Aug 03, 2025 | 1:58 AM

आशियाई क्रिकेट परिषदेने 26 जुलैला बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील वादानंतरही या दोन्ही देशाच्या क्रिकेट संघांना एकाच गटात ठेवलं आहे. एसीसीने 26 जुलैला संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं होतं. मात्र एका गोष्टीचा सस्पेन्स ठेवला होता. एसीसीने अखेर अनेक दिवसांनी हा सस्पेन्स संपवला आहे. एसीसीने 2 ऑगस्टला या स्पर्धेबाबत मोठी घोषणा केली आहे.

एसीसीने या स्पर्धेतील सर्व सामने कुठे होणार? याची माहिती दिली आहे. एसीसीने 26 तारखेला या स्पर्धेतील सामने कुठे होणार याबाबत माहिती दिली नव्हती. यूएईमध्ये सामन्यांचं आयोजन होणार असल्याचं स्पष्ट होतं. मात्र त्यानंतरही स्टेडियम निश्चित नव्हते. मात्र आता यावर पडदा पडला आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हे अबुधाबी आणि दुबईत खेळवण्यात येणार असल्याची माहिती एसीसीने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

भारत-पाकिस्तान सामन्याबाबत वाद

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कठोर भूमिका घेतली. भारताने पाकिस्तान सोबतचे बहुतांश व्यवहार बंद केलेत. क्रीडा क्षेत्रातही याचे परिणाम झाले आहेत. इंडिया चॅम्पियन्सने वर्ल्ड लिजेंड्स चॅम्पियन्स स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध 2 सामन्यांवर बहिष्कार घातला. त्यामुळे आता आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यालाही नेटकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे.

दोन्ही संघात साखळी फेरीत 1 सामना होणार असल्याचं निश्चित आहे. तसेच सुपर 4 आणि त्यानंतर अंतिम सामना होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे साखळीनंतर या 2 शेजारी देशांच्या संघात 2 सामने होण्याची शक्यता आहे. आता हे सामने होणार की नाहीत? हे काळच ठरवेल. मात्र एसीसीने भारत-पाकिस्तान सामना कुठे होणार हे जाहीर केलंय

भारताचे सामने कुठे?


स्पर्धेतील सहभागी प्रत्येक संघ साखळी फेरीत प्रत्येकी 3-3 सामने खेळणार आहे. त्यानुसार भारतीय संघ 10 सप्टेंबर (यूएई) , 14 सप्टेंबर (पाकिस्तान) आणि 19 सप्टेंबरला (ओमान) विरुद्ध साखळी फेरीतील भिडणार आहे. भारतीय संघाचे पहिले 2 सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. तर तिसरा आणि अंतिम सामना हा अबुधाबीत खेळवण्यात येणार आहे.