
आशिया कप 2025 स्पर्धेत भारत आणि ओमान यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने काही प्रयोग केले. मधल्या फळीतील फलंदाजांना वर खेळण्याची संधी दिली. तिसऱ्या क्रमांकावर संजू सॅमसनला तर चौथ्या क्रमांकावर हार्दिक पांड्या बढती दिली. पण संजू सॅमसन वगळता हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि शिवम दुबे काही खास करू शकले नाहीत. यात अष्टपैलू हार्दिक पांड्या कमनशिबी निघाला. कारण मोठ्या ऐटीत फलंदाजीला आला खरा पण संजू सॅमसनच्या एका फटक्यामुळे थेट तंबूचा रस्ता धरावा लागला. संजू सॅमसनला दोषही देता येणार नाही. कारण ज्या पद्धतीने बाद झाला त्यासाठी त्याला नशिबालाच दोष द्यावा लागेल.
सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्मा बाद झाला. 38 धावांवर असताना जितेन रामनंदानीच्या गोलंदाजीवर बॅटला कट लागली आणि थेट विकेटकीपर विनायक शुक्लाच्या हाती चेंडू गेला. त्यानंतर फलंदाजीला हार्दिक पांड्या आला. त्याने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत नॉनस्ट्राईक गाठली होती. तिसऱ्या चेंडूवर मात्र नशिब फुटकं निघालं. संजू सॅमसनने स्ट्रेट ड्राईव्ह मारला. हा चेंडू जितेन रामनंदानीच्या हाताला लागून थेट स्टंपवर आदळला. हार्दिक पांड्यानेही क्रिझ सोडलं होतं. त्यामुळे त्याला फक्त बघत राहण्याशिवाय पर्यात उरला नाही. त्यामुळे त्याचा खेळ फक्त एका चेंडूत संपला.
I’ve never seen a more unlucky cricketer than Hardik Pandya 💔 pic.twitter.com/ojDlyWyzU1
— RISHAV (@Imrishav108) September 19, 2025
दुसरीकडे, संजू सॅमसन मात्र या सामन्यात चमकला. पहिल्या दोन सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. मात्र यावेळी त्याचं तिसऱ्या स्थानावर प्रमोशन झालं. या संधीचं सोनं त्याने केलं. त्याने आपला फॉर्म असल्याचं दाखवून दिलं. इतर फलंदाज बाद होत असताना त्याने एका बाजूने खिंड लढवली. त्याची खेळी आक्रमक नव्हती. त्याने या सामन्यात त्याने 41 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने चौकार मारत अर्धशतकी खेळी साजरी केली.