
बांगलादेश क्रिकेट टीमने अफगाणिस्तान, टीम इंडियानंतर आशिया कप 2025 स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. आशिया कप स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने हाँगकाँगवर 7 विकेट्सने मात केली. हाँगकाँगने बागंलादेशसमोर 144 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशने हे आव्हान 14 बॉलआधी आणि 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बांगलादेशने 17.4 ओव्हरमध्ये 144 धावा केल्या आणि विजय मिळवला. बांगलादेशच्या या विजयात कॅप्टन लिटन दास याने प्रमुख भूमिका बजावली. लिटन दास याने सर्वाधिक 59 धावा केल्या. तर तॉहिद हृदॉय याने लिटनला चांगली साथ दिली.
बांगलादेशची विजयी धावांचा पाठलाग करता ठिकठाक सुरुवात झाली. मात्र हाँगकाँगने बांगलादेशला ठराविक अंतराने 2 झटके दिले. परवेझ इमोन 19 आणि तांझिज तमिम याने 14 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे बांगलादेशचा स्कोअर 2 आऊट 47 असा झाला.
त्यानंतर लिटन दास आणि तॉहिद हृदॉय या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करत बांगलादेशचा विजय निश्चित केला. हाँगकाँगने या भागीदारी दरम्यान जोडीला चांगलाच घाम फोडला. मात्र त्याचा फार परिणाम झाला नाही. बांगलादेश विजयाच्या उंबरठ्यावर असताना लिटन आणि तॉहिद ही जोडी हाँगकाँगने फोडली. लिटन आऊट झाला.
लिटन दास याने 39 बॉलमध्ये 151.28 च्या स्ट्राईक रेटने 59 रन्स केल्या. लिटनने या खेळीत 1 सिक्स आणि 6 फोर लगावले. त्यानंतर तॉहिदने उर्वरित 2 धावा करुन बांगलादेशला विजयी केलं. तॉहिदने 36 बॉलमध्ये 1 फोरसह नॉट आऊट 35 रन्स केल्या. हाँगकाँगसाठी आतिक इक्बाल याने 2 विकेट्स मिळवल्या. तर आयुष शुक्ला याने 1 विकेट मिळवली.
बांगलादेशने या विजयासह 11 वर्षांपूर्वीचा एक हिशोब बरोबर केला. बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग या दोन्ही संघांची टी 20i क्रिकेटमध्ये आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ होती. याआधी दोन्ही संघ 11 वर्षांपूर्वी टी 20i वर्ल्ड कप 2014 या स्पर्धेत भिडले होते. तेव्हा हाँगकाँगने बांगलादेशवर 2 विकेट्सने विजय मिळवत मोठा अपसेट केला होता. बांगलादेशने त्यानंतर अखेर विजय मिळवत त्या पराभवाची परतफेड केली.
बांगलादेशची विजयी सुरुवात
Composed chase! Bangladesh sealed victory by 7 wickets. ✅ Bangladesh 🆚 Hong Kong, China | Match 3 | Asia Cup 2025
11 September 2025 | 8:30 PM | Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi#Bangladesh #TheTigers #BCB #Cricket #AsiaCup #Cricket #TigersForever #AsiaCup2025 pic.twitter.com/jzyd6GuClT
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 11, 2025
दरम्यान हाँगकाँगचा या पराभवासह स्पर्धेतून पॅकअप झालं. हाँगकाँगचा हा या स्पर्धेतील एकूण आणि सलग दुसरा पराभव ठरला. हाँगकाँगचा या साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 15 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.