
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. भारताने साखळी फेरीतील 3 पैकी सलग 2 सामने जिंकले. इंडियाने यासह ए ग्रुपमधून सुपर 4 मध्ये पोहचणारी पहिली टीम हा बहुमान मिळवला. भारताने यूएई आणि त्यानंतर पाकिस्तानला लोळवलं. भारताने सलग 2 विजयांसह पॉइंट्स टेबलमधील अव्वल स्थान कायम राखलं आहे. टीम इंडिया लीग स्टेजमधील आपल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ओमान विरुद्ध खेळणार आहे. हा सामना शुक्रवारी 19 सप्टेंबरला होणार आहे.
टीम इंडिया सुपर 4 मध्ये पोहचली असल्याने ओमान विरुद्धचा सामना औपचारिकता आहे. त्यामुळे पहिल्या 2 सामन्यात संधी न मिळालेल्या टीम इंडियातील खेळाडूंचा ओमान विरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल करु शकते. टीम मॅनेजमेंट कुणाला विश्रांती देऊन कुणाचा समावेश करु शकते? याबाबत जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंह याचं ओमान विरूद्धच्या सामन्यातून टी 20 आशिया कप स्पर्धेत पदार्पण होऊ शकतं. मात्र रिंकूला कुणाच्या जागी संधी मिळणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
रिंकूने आशिया कप स्पर्धेआधी झालेल्या यूपीएल 2025 स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. रिंकुने त्या स्पर्धेत 24 षटकारांच्या मदतीने एकूण 372 षटकार लगावले होते. रिंकु व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा या दोघांना संधी दिली जाऊ शकते. तर हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या दोघांना विश्रांती दिली जाऊ शकते.
रिंकु, अर्शदीप आणि हर्षित हे तिघेही ओमान विरुद्ध प्लेइंग ईलेव्हनचा भाग असू शकतात, असं दुबईत रिपोर्टिंग करणारे वरिष्ठ पत्रकार विमल कुमार यांनी म्हटलं. त्यामुळे हा अंदाज किती खरा ठरतो, हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ओमान यांच्यातील सामना अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे.
ओमान विरूद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा/रिंकू सिंह, शिवम दुबे, हर्षित राणा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती.