
कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये बुधवारी 29 ऑक्टोबरला टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी 20i सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे मोठ्या उत्साहाने मैदानात आलेल्या क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा झाली. क्रिकेट चाहते निराश होऊन मैदानाबाहेर परतले. मात्र आता दुसऱ्या टी 20i सामन्यासाठी चाहते पुन्हा सज्ज झाले आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी 20i सामना हा एमसीजी अर्थात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 15 मिनिटांनी टॉस झाला.
सलग दुसऱ्या सामन्यात भारताच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला. मिचेल मार्श याने टॉस जिंकला. मार्शने फिल्डिंगचा निर्णय घेत पुन्हा एकदा भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताने पहिल्या सामन्यात 9.4 ओव्हरमध्ये फटकेबाजी करत 97 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भारतीय चाहत्यांना टीम इंडियाकडून दुसऱ्या सामन्यात अशीच फटकेबाजी अपेक्षित आहे. अभिषेक शर्मा याला गेल्या सामन्यात मोठी खेळी करता आली नव्हती. त्यामुळे अभिषेककडून चाहत्यांना एमसीजीमध्ये फटकेबाजीची आशा आहे.
कॅप्टन सूर्यकुमार यादव याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. टीम इंडिया पहिल्या सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरली आहे. तर ऑस्ट्रेलियाने एकमेव बदल केल्याची माहिती कॅप्टन मिचेल मार्श याने दिली. जोश फिलीप याच्या जागी मॅथ्यू शॉर्ट याचा समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडियाचा टी 20i मधील सर्वात यशस्वी गोलंदाज अर्शदीप सिंह याच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. कॅप्टन सूर्याने दुसऱ्या सामन्यातही अर्शदीपला संधी दिली नाहीय. अर्शदीपला पहिल्या सामन्यात डच्चू देण्यात होता. त्यामुळे दुसऱ्या क्रिकेट सामन्यात त्याचा समावेश केला जाईल, असं म्हटलं जात होतं. मात्र अर्शदीपचा मेलबर्न मॅचसाठीही विचार करण्यात आला नाहीय.
ऑस्ट्रेलियाचे अंतिम 11 शिलेदार : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टीम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल ओवेन, मार्कस स्टोयनिस, झेव्हीयर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुह्नेमन आणि जोश हेझलवुड.
सूर्यासेनेचे 11 भिडू : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग आणि जितेश शर्मा.