WI vs AUS : ऑस्ट्रेलियाकडून ओपिनंग जोडीत बदल, पहिल्या टेस्टसाठी बुमराहसोबत पंगा घेणारा सलामीला येणार

West Indies vs Australia 1st Test : वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सलामीचा सामना हा केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन येथे आयोजित करण्यात आला आबहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे.

WI vs AUS : ऑस्ट्रेलियाकडून ओपिनंग जोडीत बदल, पहिल्या टेस्टसाठी बुमराहसोबत पंगा घेणारा सलामीला येणार
Jasprit Bumrah And Sam Konstas
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jun 25, 2025 | 5:02 PM

ऑस्ट्रेलिया टीम पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये विजयी होण्यास अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2025  फायनलमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला.  त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील त्यांची पहिली कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज दौऱ्यात 3 कसोटी सामने खेळणार आहे. उभयसंघात 25 जूनपासून पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने प्लेइंग ईलव्हनची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यासाठी सलामी जोडीत बदल केला आहे. मानर्स लबुशेन याच्या जागी टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराह याच्यासोबत भिडणाऱ्या सॅम कॉनस्टास याला ओपनर म्हणून संधी दिली गेली आहे.

सॅमने टीम इंडिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-2025 कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र सॅमला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2025 साठी संधी मिळाली नव्हती. या महाअंतिम सामन्यात उस्मान ख्वाजा याच्यासह मार्नस लबुशेन याने ओपनिंग केली होती. तर दुसऱ्या बाजूला मार्नसला गेल्या काही सामन्यांपासून धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे मार्नसला पहिल्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं नाही.

तसेच सॅम व्यतिरिक्त पहिल्या कसोटीत जोश इंग्लिस खेळताना दिसणार आहे. इंग्लिसने आयपीएलच्या 18 व्या मोसमात पंजाब किंग्सकडून खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच इंग्लिसने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. सॅम आणि उस्मान ख्वाजा ही जोडी सलामीला येईल. तर ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी येऊ शकतो. इंग्लिस चौथ्या तर हेड पाचव्या स्थानी बॅटिंगसाठी येऊ शकतो. तसेच ऑलराउंडर म्हणून ब्यू वेबस्टर याचाही समावेश करण्यात आला आहे.

एलेक्स कॅरी विकेटकीपर म्हणून या सामन्यात खेळणार आहे. तर अंतिम 11 खेळाडूंमध्ये 3 वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांचा समावेश आहे. तर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी नॅथन लायन याच्यावर असणार आहे.

वेस्ट इंडिज विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ईलेव्हन : उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, कॅमरून ग्रीन, जोश इंग्लिस, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेझलवुड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन.