वुमन्स वर्ल्डकपचं पहिलं शतक एशले गार्डनरच्या नावावर, या तीन रेकॉर्डची केली नोंद

Australia Women vs New Zealand Women, 2nd Match: वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एशले गार्डनरची बॅट चांगलीच तळपली. पाच विकेट गेल्यानंतर तिने संयमी खेळी करत संघाला तारलं.

वुमन्स वर्ल्डकपचं पहिलं शतक एशले गार्डनरच्या नावावर, या तीन रेकॉर्डची केली नोंद
वुमन्स वर्ल्डकपचं पहिलं शतक एशले गार्डनरच्या नावावर, या तीन रेकॉर्डची केली नोंद
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 01, 2025 | 9:01 PM

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 49.3 षटकात सर्व गडी गमवून 326 धावा केल्या. न्यूझीलंडसमोर विजयासाी 327 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पण या सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्थिती नाजूक होती. अवघ्या 128 धावांवर ऑस्ट्रेलियाने 5 गडी गमावले होते. त्यामुळे 200 चा आकडा तरी गाठणार का? अशी स्थिती होती. पण एशले गार्डनरचा झंझावात क्रीडाप्रेमींना अनुभवायला मिळाला. एशले गार्डनरने 83 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकार मारत 115 धावांची खेळी केली. यावेळी तिचा स्ट्राईक रेट हा 138.55 चा होता. एशले गार्डनरने दबाब असूनही 77 चेंडूत शतक पूर्ण केलं. एशले गार्डनरने या शतकी खेळीसह तीन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. चला जाणून घेऊयात तिच्या नावावर कोणत्या रेकॉर्डची नोंद झाली ते..

एशले गार्डनरचं शतक खास आहे. कारण संघाला जेव्हा धावांची गरज होती. तेव्हा तिने खिंड लढवली आणि संघाला यातून बाहेर काढलं.न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांना जेरीस आणलं होतं. तेव्हा एशले गार्डनरची बॅट चालली. यासह एशले गार्डनरने तिने पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप स्पर्धेत शतक ठोकलं आहे. एशले गार्डनरचं क्रिकेट कारकिर्दीतील हे दुसरं शतकं आहे. विशेष म्हणजे दोन्ही शतकं याच वर्षी झळकावली आहेत. तिसरं म्हणजे एशले गार्डनरचा हा वनडेतील बेस्ट स्कोअर आहे. त्यामुळे तिने वैयक्तिक तीन रेकॉर्ड केले आहेत.

वुमन्स वनडे क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा खाली खेळताना 100 हून अधिक धावा करण्याचा विक्रम एशले गार्डनरच्या नावावर नोंदवला गेला आहे. तिने 115 धावांची खेळी केली. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या कॅम्पबेलच्या नावावर होता. तिने 105 धावांची खेळी केली होती. तर दक्षिण अफ्रिकेच्या डर्कसेनने 104 धावांची खेळी केली आहे. चौथ्या क्रमांकावर पुन्हा एशले गार्डनरच आहे. कारण तिने यात वर्षी इंग्लंडविरुद्ध 102 धावांची खेळी केली होती. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाची वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वाधिक धावांची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 1997 मध्ये डेन्मार्कविरुद्ध 412, इंग्लंडविरुद्ध 2022 मध्ये 356 धावा केल्या होत्या. आता न्यूझीलंडविरुद्ध 326 धावा केल्यात.