BAN vs HK : बांगलादेशसमोर 144 धावांचं आव्हान, हाँगकाँग 11 वर्षांनी पुन्हा विजय मिळवणार?

Bangladesh vs Hong Kong 1st Innings Highlights Asia Cup 2025 : बांगलादेश क्रिकेट टीमसमोर आशिया कप 2025 स्पर्धेत विजयी सुरुवात करण्यासाठी 144 धावांच आव्हान आहे. तर हाँगकाँगसाठी हा सामना करो या मरो असा आहे.

BAN vs HK : बांगलादेशसमोर 144 धावांचं आव्हान, हाँगकाँग 11 वर्षांनी पुन्हा विजय मिळवणार?
Bangladesh Cricket Team
Image Credit source: Tanvin Tamim/DRIK/Getty Images And Windies Cricket
| Updated on: Sep 11, 2025 | 10:41 PM

टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग आमनेसामने आहेत. हाँगकाँगने या मोहिमेतील आपल्या दुसऱ्या आणि करो या मरो सामन्यात बांगलादेशसमोर 144 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हाँगकाँगने अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 143 धावा केल्या. त्यामुळे हाँगकाँगचे गोलंदाज या धावांचा बचाव करण्यात यशस्वी ठरतात की बांगलादेश विजयी सुरुवात करणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

हाँगकाँगची बॅटिंग

निझाकात खान, विकेटकीपर झीशान अली, कॅप्टन यासिम मुर्तझा आणि बाबर हयात या चौघांनी दिलेल्या योगदानामुळे हाँगकाँगला 140 पार पोहचता आलं. मात्र या चौघांपैकी एकालाही या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. हाँगकाँगसाठी निझाकत खान याने सर्वाधिक धावा केल्या. निझाकतने 40 बॉलमध्ये 105 च्या स्ट्राईक रेटने 42 रन्स केल्या. निझाकतने या दरम्यान 1 सिक्स आणि 2 फोर लगावले. ओपनर झिशान यालाही चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजाने झिशानला रोखलं. तंझिम हसन साकिब याने झिशानला मुस्तफिजुरच्या हाती कॅच आऊट केलं. झिशानने 34 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 30 रन्स केल्या.

कॅप्टन यासिम मुर्तझा याच्या खेळीला रन आऊट झाल्याने ब्रेक लागला. धाव असतानाही यासिमच्या सहकाऱ्याने धाव घेण्यास नकार दिला. त्यामुळे यासिमला रन आऊट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं. यासिमने 19 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह 28 रन्स केल्या. तर टी 20i आशिया कपमध्ये शतक करणारा पहिला फलंदाज अशी बिरुदावली मिरवणारा बाबर हयात याने निराशा केली. बाबरने 12 बॉलमध्ये 14 रन्स करत मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर हाँगकाँगसाठी इतर एकालाही दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

बांगलादेशकडून एकूण 5 जणांनी बॉलिंग केली. मात्र त्यापैकी दोघे अपयशी ठरले. मेहदी हसन आणि मुस्तफिजूर या दोघांना एकही विकेट घेता आली नाही. तर तास्किन अहमद, तंझिम हसन साकिब आणि रिशाद हौसेन या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

हाँगकाँग 11 वर्षांनंतर पुन्हा विजय मिळवणार?

दरम्यान दोन्ही संघ 11 वर्षांआधी पहिल्यांदा टी 20 फॉर्मेटमध्ये आमनेसामने आले होते. बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग यांच्यात 20 मार्च 2014 साली टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत आमनासामना झाला होता. तेव्हा हाँगकाँगने 109 धावांचं आव्हान हे 2 बॉल राखून आणि 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं. त्यामुळे आता हाँगकाँग 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा विजय मिळवणार की बांगलादेश त्या पराभवाची परतफेड करणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.