
पाकिस्तान क्रिकेट टीमची बांगलादेश दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली. यजमान बांगलादेशने एकदिवसीय मालिकेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानवर टी 20I स्टाईलने धुव्वा उडवत एकतर्फी असा विजय मिळवला. या लाजिरवाण्या पराभवामुळे पाकिस्तानवर सडकून टीका केली जात आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचे बहुतांश आणि प्रमुख फलंदाज अपयशी ठरले होते. माझ सदाकत यालाही काही खास करता आलं नव्हतं. मात्र सदाकत याने 13 मार्च रोजी मालिकेच्या दृष्टीने निर्णायक आणि पाकिस्तानसाठी असलेल्या करो या मरो सामन्यात धमाका केला. माझने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
माझने ढाक्यातील शेरे ए बांगला नॅशनल स्टेडियममध्ये बांगलादेश विरुद्ध खणखणीत अर्धशतक झळकावलं. माझने अवघ्या 31 बॉलमध्ये अर्धशतकी टप्पा गाठला. माझने अर्धशतकानंतरही तडाखेदार बॅटिंग सुरु ठेवली होती. मात्र माझ अर्धशतकानंतर 25 धावा जोडून बाद झाला. माझ 46 बॉलमध्ये 75 रन्स करुन आऊट झाला. माझने या खेळीत 5 षटकार आणि 6 चौकार लगावले. माझने 75 धावांची खेळी केली ही 163 च्या स्ट्राईक रेटने केली. इतकंच नाही तर माझने पाकिस्तानसाठी साहिबजादा फरहान याच्यासह सलामी शतकी भागीदारी करत अप्रतिम अशी सुरुवात मिळवून दिली.
ओपनिंगला आलेल्या माझने पहिल्याच बॉलपासून बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई करायला सुरुवात केली. माझने मैदानात चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 31 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. माझचं एकदिवसीय कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. माझने पावरप्लेमध्ये तडाखा कायम ठेवत धमाका केला. एकट्या माजने पावरप्लेमधील 10 ओव्हरमध्ये 63 धावा केल्या. हा मोठा विक्रम आहे.
माझ यासह पावरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाकिस्तानी फलंदाज ठरला आहे. माझने याबाबतीत आपल्या माजी फलंदाजाचा विक्रम मोडीत काढला आहे. याआधी 2016 साली शर्जील खान याने एकट्याने पावरप्लेमध्ये 58 धावा केल्या होत्या.
दरम्यान माझने देशांतर्गत क्रिकेटध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. माझने 38 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 1 हजार 451 धावा केल्या आहेत. तसेच माझने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 3 शतकांसह 990 धावा केल्या आहेत.
दरम्यान बांगलादेश या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे पाकिस्तानला मालिकेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर कोणत्याही स्थितीत दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आता या दुसऱ्या सामन्याचा काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.