BBL 2026: मोहम्मद रिझवानमुळे पाकिस्तानची होती नव्हती सगळी लाज गेली, कर्णधाराने फलंदाजी सोडायला लावली

बिग बॅश लीग 2025-26 स्पर्धेत पाकिस्तानचे खेळाडू खेळत आहेत. पण पाकिस्तानी खेळाडूंमुळे पुरती लाज गेल्याचं दिसत आहे. फ्रेंचायझींना पाकिस्तानी खेळाडूंना संघात घेतल्याचा नक्कीच पश्चाताप झाला असावा. आता मोहम्मद रिझवानमुळे डोक्यावर हात मारायची वेळ आली आहे.

BBL 2026: मोहम्मद रिझवानमुळे पाकिस्तानची होती नव्हती सगळी लाज गेली, कर्णधाराने फलंदाजी सोडायला लावली
मोहम्मद रिझवानमुळे पाकिस्तानची होती नव्हती सगळी लाज गेली, कर्णधाराने फलंदाजी सोडायला लावली
Image Credit source: Darrian Traynor/Getty Images
| Updated on: Jan 12, 2026 | 5:14 PM

पाकिस्तानचा स्टार विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवानने बिग बॅश लीगमध्ये होती नव्हती ती सर्व लाज घालवली. पाकिस्तानी टी20 संघातून मोहम्मद रिझवानला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पण बिग बॅश लीगमधून पुनरागमनासाठी धडपड करत होता. या स्पर्धेच्या 15 व्या पर्वात मेलबर्न रेनेगेड्सने मोठ्या आशेसह त्याला संघात घेतलं होतं. मात्र या स्पर्धेत बाजू सावरण्याऐवजी लाज घालवून बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग स्पर्धेत मोहम्मद रिझवान फ्लॉप ठरला आहे. या लीग स्पर्धेत त्याची बॅट काही चालली नाही. उलट एका सामन्यात लायकी काढून बसला. मेलबर्न रेनेगेड्ससाठी खेळताना मोहम्मद रिझवानच्या बॅटमधून काही धावा निघत नव्हता. त्याची फलंदाजी पाहून फ्रेंचायझी चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. कर्णधारालाही ही बाब काही रूचली नाही. त्याने मोहम्मद रिझवानला फलंदाजी सोडण्यास भाग पाडलं. बिग बॅश लिग स्पर्धेत रिटायर्ड हर्ट होणारा पहिला विदेशी फलंदाज ठरला आहे.

मोहम्मद रिझवान या स्पर्धेत एकही अर्धशतक झळकावू शकला नाही. इतकंच काय तर त्याची फलंदाजीचा स्ट्राईक रेट पाहून टीकेचा धनी ठरला आहे. प्रत्येक सामन्यात त्याच्या फलंदाजीची शैली कायम असल्याचं पाहून मेलबर्न रेनेगेड्स संघाचा संयमाचा बांध फुटला आणि अखेर कर्णधाराला निर्णय घेणं भाग पडलं. 12 जानेवारीला सिडनी थंडर आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात रेनेगेड्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमवून 170 धावा केल्या. यात मोहम्मद रिझवानने 26 धावांचं योगदान दिलं. पण या वेगवान फॉर्मेटमध्ये या धावा करण्यासाठी त्याने 23 चेंडू घेतले. 113.04 च्या स्ट्राईक रेटने त्याची फलंदाजी सुरू होती. त्यामुळे रेनेगेड्सचा कर्णधार विल सुदरलँड वैतागला आणि मैदानातील खेळ थांबवून परत बोलवलं.

18व्या षटकात सदरलँड डगआऊटमधून उठला आणि रिझवानला फलंदाजी सोडण्यास सांगितलं. रिझवानला पहिल्यांदा काय घडलं ते कळलंच नाही. सदरलँडने तीन चार वेळा इशारा केल्यानंतर रिझवानच्या डोक्यात प्रकाश पडला आणि रिटायर्ड होत तंबूत परतला. लाज गेल्याने मान खाली घालून रिझवान मैदानातून परतला.

मोहम्मद रिझवान या स्पर्धेत पूर्ण फेल गेला आहे. त्याने या स्पर्धेतील 8 सामन्यात फक्त 167 धावा केल्या आहेत. यात एकही अर्धशतक नाही. यावेळी त्याने 152 चेंडूंचा सामना केल्यानंतर पहिला षटकार मारला होता. या धावा त्याने फक्त 101.82 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. गोलंदाजांचा स्ट्राईक रेटही त्याच्यापेक्षा चांगला असल्याचं आकडेवारीवरून दिसून आलं आहे.