
मुंबई : आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रोहित शर्मा याच्याकडे भारताचं नेतृत्व आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला गेल्या दहा वर्षांच्या आयसीसी चषकांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. टी20 वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. आयसीसीने एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यात रोहित शर्मा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना दिसत आहे. वनडे वर्ल्डकप जेतेपदाबाबत त्याला एक प्रश्न विचारण्यात आला. 1983 चा वर्ल्डकप की 2011 च्या वर्ल्डकप कोणत्या विजयाला महत्त्व देशील? तेव्हा त्यांनी दोन्ही विजय महत्त्वाचे होते आणि दोन्ही वर्ल्डकपला माझी तितकीच पसंती आहे.
युजवेंद्र चहल आणि इशान किशन बाबत रोहित शर्माला मजेशीर प्रश्न विचारण्यात आला. या दोघांपैकी कोणाच्या बाजूला बसमध्ये बसणं पसंत करशील. त्यावर रोहित शर्माने उत्तर देत म्हणाला की, मला सामन्यापूर्वी पूर्णपणे शांतता हवी असते. या दोघांसोबत बसून ते शक्य नाही. रोहित शर्मा याच्या मते हे दोन्ही खेळाडू खूप बडबड करतात.
रोहित शर्माला आवडीच्या शॉटबाबतही विचारण्यात आलं. कवरड्राईव्ह की पुल शॉट मारायला आवडतं. तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता पुल शॉटला पसंती दिली. हा शॉट रोहित शर्मा एकदम चांगल्या प्रकारे खेळतो. क्रीडा रसिकांनी त्याची अनुभूती देखील घेतली आहे.
शाहीन अफरीदी की मिचेल स्टार्क यापैकी कोणता गोलंदाज सर्वात घातक आहे. त्यावर त्याने दोन्ही गोलंदाज घातक असल्याचं सांगितलं आहे. दोघ जण नवा चेंडू असताना भेदक गोलंदाजी करतात. दोघेही वेगाने चेंडू फेकतात आणि स्विंग करण्याची क्षमता आहे.
आशिया कप 2023 स्पर्धेसाठी अजूनही टीम इंडिया जाहीर झालेली नाही. जसप्रीत बुमराह याने जोरदार कमबॅक केलं आहे. त्यामुळे त्याचं नाव निश्चित आहे. तर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे देखील फिट होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.