
Champions Trophy 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) विनंती केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये होणार आहे. पण याला भारताने विरोध केला आहे. चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानातच खेळवण्यासाठी हक्क करारावर स्वाक्षरी करण्याची विनंती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला केलीये. भारताने राजकीय आणि सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात येण्यास नकार दिल्यास PCB ला नुकसान भरपाई द्यावी असं देखील पीसीबीने म्हटलं आहे.
पाकिस्तानकडे यंदा या स्पर्धेचे यजमानपद आहे. पण आयसीसीने अद्याप त्याच्याशी महत्त्वाच्या यजमान करारावर स्वाक्षरी केलेली नाही. पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ आणि सीओओ सलमान नसीर यांनी फेब्रुवारी-मार्च, 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यासाठी अहमदाबादमध्ये आयसीसी कार्यकारी मंडळाची भेट घेतली होती.
बीसीसीआय मात्र आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांंनी मात्र कोणताही निर्णय एकाबाजुने घेतला जावू नये असे म्हटले आहे.
पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी आयसीसीला सांगितले होते की जर भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला तर जागतिक संस्थेने स्वतंत्र सुरक्षा एजन्सी नियुक्त करावी. एजन्सी भारतासह सहभागी संघांच्या सुरक्षेच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी पाकिस्तान सरकार आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकते. गेल्या दोन वर्षांत अनेक प्रमुख संघांनी कोणत्याही सुरक्षेशिवाय पाकिस्तानचा दौरा केला आहे. असं ही त्यांनी म्हटले आहे.
भारताने आपला संघ पाठवला नाही आणि त्याचे सामने दुसर्या देशात हलवले गेले तर आयसीसीने यासाठी पाकिस्तानला भरपाई दिली पाहिजे असा दावा देखील पीसीबीने केल्याचं समोर आलं आहे.
पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावाचे संबंध पाहता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सरकार भारतीय संघ पाकिस्तानला पाठवणार नाही. त्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान होऊ शकते. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाकिस्तानने आंशिकपणे आयोजित केलेल्या आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता.
बीसीसीआयने 2025 मध्ये भारताने पाकिस्तानमध्ये जावून खेळावे की नाही याचा निर्णय सरकार घेईल असे स्पष्टपणे आयसीसीला कळवले आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.