
मुंबई : टीम इंडियाचा भरवशाचा फलंदाज म्हणून ओळख असलेल्या चेतेश्वर पुजारा याने नवीन वर्षात शानदार सुरूवात केली आहे. खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून डच्चू मिळालेल्या पुजारा याला कमबॅक करण्यासाठी जास्त दिवस लागणार नसल्याचं दिसत आहे. रणजी क्रिकेटमध्ये पुजारा याने द्विशतक ठोकत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पुजाराच्या द्विशतकाची क्रीड वर्तुळात जोरदार चर्चा आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. पुजाराने ठोकलेल्या द्विशकामुळे निवड समितीचंही लक्ष वेधलं आहे.
सौराष्ट्र आणि झारखंड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा याने 356 चेंडूत 243 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी कारकिर्दीमधील पुजारा याचं 17 द्विशतक आहे. या द्विशतकासह चेतेश्वर पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत व्हिव्हीएस लक्ष्मण याला मागे टाकलं आहे. भारताकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू ठरला आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकं करण्याच्या यादीमध्ये पुजारानेही एन्ट्री केली आहे. यादीमध्ये डॉन ब्रॅडमन याने 37 द्विशतके मारली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा वॉली हॅमंड 36 द्विशतके तर तिसऱ्या स्थानावर एलियास हेन्री हेन्ड्रेन 22 द्विशतक आणि हर्बर्ट सटक्लिफ आणि मार्क रामप्रकाश यांच्यासह पुजारा 17 द्विशतकांसह चौथ्या स्थानावर आहे.
भारताकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सुनील गावसकर टॉपला असून त्यांनी 25,834 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर 25,396 धावा, तिसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड असून त्याने 25,396 धावा केल्या आहेत.
दरम्यान, चेतेश्वर पुजारा टीम इंडियाकडून शेवटचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायलनमध्ये खेळला होता. ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियाचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं होतं. या सामन्यात पुजारा खास काही करू शकला नाही. खराब कामगिरीमुळे त्याला संघातील आपलं स्थान गमावावं लागलं. मात्र रणजीमध्ये धमाका करत आणखी चमकदार कामगिरी केली तर त्याच्यासाठी टीम इंडियाची दारे खुली होण्याची दाट शक्यता आहे.