CSK vs KKR : केकेआरसमोर पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान, चेन्नईला घरच्या मैदानात पराभूत करणार?

CSK vs KKR IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्स चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानात यलो आर्मी विरुद्ध 2 हात करणार आहे. या सामन्यातून केकेआर ओपनिंग करणार की एकूण चौथा सामना गमावणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

CSK vs KKR : केकेआरसमोर पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान, चेन्नईला घरच्या मैदानात पराभूत करणार?
Kolkata Knight Riders Huddle Talk
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 14, 2026 | 4:18 AM

आयपीएल स्पर्धेत 19 व्या हंगामातील (IPL 2026) 22 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्ससमोर मंगळवारी 14 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान असणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स दोन्ही संघांचा हा 19 पर्वातील पाचवा सामना असणार आहे. दोन्ही संघांची या मोसमात वाईट स्थिती आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. चेन्नई आणि केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी आहेत. चेन्नई नवव्या तर केकेआर 10 व्या स्थानी आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना या 2 चॅम्पियन्स संघात टफ फाईट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

2 मराठी कर्णधार आमनेसामने

चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यानिमित्ताने 2 मराठमोळे कर्णधार आमनेसामने असणार आहेत. अजिंक्य रहाणे याच्याकडे कोलकाताच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी

केकेआरला आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे. तर केकेआरचा पंजाब विरुद्धचा सामना पावसाने वाया घालवला. त्यामुळे केकेआरच्या खात्यात एकमेव गुण आहे. केकेआरला या मोसमात मुंबई, हैदराबाद आणि लखनौकडून पराभूत व्हावं लागलं.

तसेच चेन्नई सुपर किंग्सला पहिल्या विजयासाठी चौथ्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागली. चेन्नईने दिल्ली कॅपिट्ल्सवर 23 धावांनी मात करुन विजयाचं खातं उघडलं. त्याआधी चेन्नईला बंगळुरु, पंजाब आणि राजस्थानकडून पराभूत व्हावं लागलं. त्यामुळ चेन्नईसमोर विजयी मालिका कायम ठेवण्याचा आव्हान असणार आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यात आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 32 वेळा आमनासामना झाला आहे. या 32 पैकी 20 सामन्यांत चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला आहे. तर केकेआरने चेन्नई विरुद्ध 11 सामन्यात मैदान मारलं आहे.

सामना किती वाजता आणि कुठे?

चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

महेंद्रसिंह धोनी याचं कमबॅक?

दरम्यान सीएसकेचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला दुखापतीमुळे पहिल्या 4 सामन्यांना मुकावं लागलं. मात्र धोनी केकेआर विरुद्धच्या सामन्याआधी मैदानात सहकाऱ्यांसह फुटबॉल खेळला. तसेच धोनीने बराच वेळ मैदानात घालवला. त्यामुळे धोनी 4 सामन्यानंतर आता कमबॅक करणार की आणखी प्रतिक्षा करावी लागणार? या प्रश्नाचं उत्तर हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.

Follow Us