
बिग बॅश लीग स्पर्धेचं 15वं पर्व सुरु आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचे खेळाडूही खेळत आहे. पण त्यांची कामगिरी एकदम सुमार राहिल्याचं पाहायला मिळत आहे. बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवानकडून अपेक्षाभंग झाला आहे. पाकिस्तानी खेळाडूंना मोठ्या अपेक्षेने फ्रेंचायझींनी विकत घेतलं होतं. पण त्यांच्याकडून हवी तशी कामगिरी झाली नाही. त्यामुळे पैसे वाया गेल्याची भावना आहे. दुसरीकडे, हारिस रऊफने त्यातल्या त्यात चांगली कामगिरी केली आहे. असं सर्व गणित असताना आणखी एक पाकिस्तानी खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. या स्पर्धेत एन्ट्री मारली खरी, पण त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं आहे. जमान खानच्या गोलंदाजीची शैली रडारवर आली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज 10 जानेवारी रोजी ब्रिस्बेन हीटसाठी पहिला सामना खेळला. पहिल्याच सामन्यात त्याच्या गोलंदाजीची तक्रार केली गेली.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, बिग बॅश लीग स्पर्धेत वेगवान गोलंदाज जमान खानच्या स्लिंगशॉट गोलंदाजी शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. सिडनी थंडरचा कर्णधार डेविड वॉर्नरने जमानच्या गोलंदाजीव आक्षेप घेतला. जमान खान गोलंदाजीला आला तेव्हा पहिलाच चेंडू वाइड टाकला. असं असलं तरी पहिलं षटक त्यातल्या त्यात बरं गेलं. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात धुलाई झाली. तिसरं षटकं संपलं तेव्हा वॉर्नरने पंचांकडे तक्रार केली. त्याची तक्रार स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाली आहे. चार वर्षांच्या मुलासारखी गोलंदाजी असल्याचं सांगितलं. त्याचा हात खूपच खाली येत असल्याचं सांगितलं.
“Like a four-year-old bowling. It stays so low.”
David Warner on Zaman Khan’s action. #BBL15 pic.twitter.com/dv9Bzw4G5v
— KFC Big Bash League (@BBL) January 10, 2026
जमान खानला एकही विकेट मिळाला नाही. सिडनी थंडर विरूद्धच्या सामन्यात पूर्णपणे फेल गेला. ब्रिस्बेन हीटने 7 विकेटने विजय मिळवला. पण यात जमान खानचं योगदान काही खास राहिलं नाही. प्रथम फलंदाजी करताना सिडनी थंडरने 180 धावा केल्या. त्यानंतर उस्मान ख्वाजाच्या मदतीने ब्रिस्बेन हीटने 16.2 षटकात लक्ष्य गाठले.
या विजयासह ब्रिस्बेन हीट पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. ब्रिस्बेन हीटचे या स्पर्धेत 4 विजय आणि 4 पराभव आहेत. सर्व विजय घरच्या मैदानावर मिळाले आहेत. त्यांचा पुढचा सामना होबार्टमध्ये गतविजेत्या संघाविरुद्ध होणार आहे. शेवटचा साखळी सामना गाब्बा येथे होईल. पुढील फेरीत पोहोचण्याचा त्यांना विश्वास असेल. दुसरीकडे, सिडनी थंडरने आता पाच सामने गमावले आहेत.