Explainer : रिंकू सिंहला टी20 फॉर्मेटमध्ये हवी तशी संधी मिळते का? त्या क्रमांकावर फलंदाजी करणं किती फायद्याचं? जाणून घ्या
भारतीय संघात रिंकू सिंह हे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. आक्रमक फलंदाजी आणि संघाला गरजेवेळी सांभाळणारा तारणहार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आहे. आयपीएल नंतर रिंकू सिंह याने आपला जलवा इंडियन टीममध्येही दाखवला आहे. पण त्याला हवी तशी संधी मिळाली नसल्याची ओरड क्रीडाप्रेमींमध्ये होतं आहे.
मुंबई : रिंकू सिंह..हे नाव आता प्रत्येक भारतीय क्रीडाप्रेमींच्या चर्चेत आहे. कारण रिंकू सिंह जिथपर्यंत मैदानात उभा आहे तिथपर्यंत सामना हरलो नाही असा एक अर्थ काढला जातो. आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्सच्या तोंडातला विजयाचा घास खेचून आणला होता. कोलकात्याला विजयासाठी 5 चेंडूत 29 धावा आवश्यकता होती. उमेश यादवने यश दयालच्या पहिल्या चेंडूवर एक धाव काढून रिंकूला स्ट्राईक दिली. त्यामुळे पाच चेंडूत 28 धावा असं समीकरण होतं. कोणीही क्रिकेटपंडित हा सामना गुजरात जिंकेल असंच म्हणालं असतं. पण रिंकू सिंह हे वादळ मैदानात उभं होतं. तेव्हा या नावाची फारशी चर्चा नव्हती. पण सलग पाच षटकार ठोकत रिंकू सिंहने विजय मिळवून दिला. त्यानंतर रिंकू है तो मुमकीन है असंच समीकरण जुळून आलं. प्रत्येक भारतीयाला त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या. आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या ताफ्यात रिंकू सिंह याच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा प्रवास सुरु झाला.
आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आयर्लंडने 20 षटकात 7 गडी गमवून 139 धावा केल्या आणि विजयासाठी 140 धावा दिल्या. 6.5 षटकात दोन गडी गमवून 47 धावा झाल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ नियमानुसार टीम इंडियाचा दोन धावांनी विजय झाला. रिंकू सिंहला पहिल्याच सामन्यात फलंदाजी मिळाली नाही. आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रिंकू सिंहला फलंदाजी मिळाली. पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या रिंकू सिंहने 21 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या आणि बाद झाला. तर आयर्लंड विरुद्ध तिसरा सामना झालाच नाही.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पराभवानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा सज्ज झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली. यात रिंकू सिंह याचं नाव पाहून क्रीडाप्रेमींना आनंद झाला. टी20 वर्ल्डकप 2024 च्या ताफ्यात रिंकू सिंह असेल असा आशावाद यामुळे वाढला आहे. पण रिंकू सिंहला टी20 फॉर्मेटमध्ये हवी तशी संधी मिळतंय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.रिंकू सिंह याचं संपूर्ण करिअर हे फलंदाजीवर अवलंबून आहे. गोलंदाजीचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे जर त्याला अपेक्षित संधी मिळाली नाही तर सिद्ध करणं कठीण आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या दोन सामन्यात रिंकू सिंह याने छाप सोडली. पण मोठी धावसंख्या करण्यासाठी त्याला वेळ मिळत नसल्याचं दिसून आलं आहे. त्यात आघाडीचे खेळाडू झटपट बाद झाले तर संधी मिळते असं चित्र आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात 3 गडी गमवून 208 धावा केल्या आणि विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना रिंकू सिंह सहाव्या स्थानावर फलंदाजी मिळाली. टीम इंडियाची 14.5 षटकात 4 बाद 154 अशी स्थिती होती. 31 चेंडूत 55 अशी स्थिती होती. रिंकू सिंहने यावेळी 14 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने 22 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूवर 1 धाव आवश्यक असताना षटकार मारला पण नो बॉलमुळे त्याची गणना झाली नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताला पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली. यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी जबरदस्त सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 77 धावांची भागीदारी केली. यशस्वी बाद झाल्यानंतर इशान किशन मैदानात उतरला. 15.2 षटकात 164 धावांवर इशान किशन बाद होत तंबूत परला. त्यानंतर सूर्यकुमार यादव हा फलंदाजीसाठी आला. 17.4 षटकात 189 धावा असताना सूर्यकुमार बाद झाला आणि रिंकू सिंह मैदानात आला. म्हणजे 14 चेंडू शिल्लक असताना रिंकू मैदानात आला. यावेळी त्याला 14 पैकी 9 चेंडू खेळण्याची संधी मिळाली. रिंकूने 9 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 31 धावा केल्या.
रिंकू सिंह हा आतापर्यंत 7 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यात त्याला 4 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने एकूण 128 धावा केल्या आहे. 38 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. 216.95 च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या आहेत. यात 12 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश आहे. धावांचा पाठलाग करताना या स्थानावर फलंदाजी करताना रिंकू सिंह कूल असतो. मोठी धावसंख्या गाठण्याची धमक त्याच्यात आहे. पण त्याच्या फलंदाजीला वाव मिळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, अशी चर्चा क्रीडाप्रेमी करत आहेत.