IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला घेऊ नको! शुबमन गिलला दिला असा विचित्र सल्ला

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरु होणार आहे. भारतासाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित यावर अवलंबून असणार आहे. असं असताना पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहला खेळवू नको असा सल्ला कर्णधार शुबमन गिलला देण्यात आला आहे.

IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला घेऊ नको! शुबमन गिलला दिला असा विचित्र सल्ला
जसप्रीत बुमराह
Image Credit source: Darrian Traynor/Getty Images
| Updated on: Jun 15, 2025 | 7:01 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 च्या पर्वाला भारतीय इंग्लंड दौऱ्यापासून सुरुवात करणार आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिकेच्या निकालामुळे विजयी टक्केवारी फरक पडणार आहे. त्यामुळे ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. भारताचा पहिला कसोटी सामना 20 जून रोजी सुरु होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाचा कस लागणार आहे. शुबमन गिल कोणत्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरणार याची खलबतं सुरु आहेत. निश्चितच कोणत्याही कर्णधाराला संघात जसप्रीत बुमराह असावा असं वाटणारच..पण ऑस्ट्रेलियाच्या माजी फिरकीपटूने जसप्रीत बुमराहाबाबत आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. बुमराहला पहिल्या कसोटी सामन्यात खेळवू नको असा विचित्र सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने सांगितलं की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसप्रीत बुमराह जखमी झाला होता. त्या दुखापतीतून अजूनही तो सावरलेला नाही. त्यामुळे त्याला पहिल्या कसोटीत खेळवणं धोक्याचं ठरेल.

ब्रॅड हॉगने एका मुलाखतीत सांगितलं की, ‘बुमराहला लॉर्डमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सांभाळून ठेवलं पाहीजे. येथे चेंडू टाकल्यानंतर जास्त हालचाल होते. त्यामुळे येथे एका स्पेले सामन्याचं रुप बदलू शकतं.’ जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचा मॅन विनर खेळाडू आहे आणि त्याचा योग्य ठिकाणी वापर झाला पाहीजे, असंही त्याने पुढे सांगितलं. जसप्रीत बुमराहकडे सामना पालटण्याची ताकद आहे. तो मालिकेतील ट्रम्प कार्ड ठरेल. त्यामुळे त्याचं लॉर्ड्समध्ये खेळणं गरजेचं आहे. लॉर्ड्समध्ये भारतीय संघ 10 जुलैला तिसरा कसोटी सामना खेळणार आहे.

ब्रॅड हॉगने सांगितलं की, ‘जर मी असतो तर बुमराहला पहिला कसोटी सामना खेळवला नसता. त्यामुळे इंग्लंडने विचार केला असता की त्यांच्याकडे बुमराह नाही आहे. हे चांगलं आहे की आम्हाला त्याचा करावा लागणार नाही. पण दुसऱ्या कसोटीपासून चिंता करू लागतील. जर दुसऱ्या कसोटी सामन्यात डाव पालटला तर इंग्लंड मालिकेत पिछाडीवर राहील.’ बुमराहने इंग्लंडविरुद्ध 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यने 26.27 च्या सरासरीने 37 विकेट घेतल्या आहेत. यात त्याने 2 वेळा पाच विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे बुमराहाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा पुन्हा एकदा आहे.