
बर्मिंगहॅममधील एजबॅस्टनमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जात आहे. आता या प्रश्नावर टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल याने प्रतिक्रिया दिली आहे. बुमराह इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत कर्णधाराने काय म्हटलं हे सविस्तर जाणून घेऊयात.
जसप्रीत बुमराह याची जागा घेणं फार अवघड आहे. मात्र संघात दुसरे गोलंदाजही चांगले आहेत आणि त्याच्याशिवाय (बुमराह) 20 विकेट्स घेणं अशक्य बाब नाहीय, असं बुमराहने म्हटलं. दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला (1 जुलै) पत्रकार परिषदचं आयोजन करण्यात आलं होतं. शुबमनला या पत्रकार परिषदेत बुमराहबाबत प्रश्न करण्यात आला. यावर बुमराह दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती शुबमनने दिली.
“जसप्रीत बुमराह उपलब्ध आहे. आम्ही फक्त बुमराहचं वर्कलोड मॅनेज करु इच्छितो. आम्ही 20 विकेट्स घेणाऱ्या आणि धावा करणाऱ्या संघाच्या शोधात आहोत. टीममध्ये कोणते खेळाडू असतील याबाबत आम्ही मैदानात उतरल्यानंतर निर्णय करु”, असं शुबमनने स्पष्ट केलं. बुमराहच्या दुसऱ्या कसोटीमध्ये खेळण्याबाबत सस्पेन्स कायम आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह याच्या जागी दुसऱ्या कसोटीत आकाश दीप याला संधी मिळू शकते. तसेच नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंह या त्रिकुटालाही प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
शुबमनने या पत्रकार परिषदेदरम्यान पहिल्या कसोटीचाही उल्लेख केला. लीड्स कसोटीतील पाचव्या दिवशी दुसऱ्या फिरकी गोलंदाजाची उणीव जाणवली. दुसरा स्पिनर असता तर भारताच्या विजयाची संधी आणखी वाढली असती, असं शुबमनने म्हटलं.
कर्णधार शुबमन गिल याची पत्रकार परिषद
VIDEO | Here’s what India Test captain Shubman Gill (@ShubmanGill) said on the availability of pacer Jasprit Bumrah ahead of the second Test against England at Edgbaston. England lead the five-match series after winning the series opener in Leeds.
“Bumrah is definitely… pic.twitter.com/dixeBM1YO8
— Press Trust of India (@PTI_News) July 1, 2025
“गेल्या सामन्यात आम्हाला जाणवलं की आमच्याकडे दुसरा फिरकी बॉलर असता तर पाचव्या दिवशी जिंकण्याची शक्यता वाढली असती”, असं शुबमनने म्हटलं. “तसेच गेला सामना पाहिल्यानंतर मला वाटतं की तशीच खेळपट्टी असेल तर 2 स्पिनरसह खेळणं चुकीचं ठरणार नाही”, असं शुबमन दुसऱ्या सामन्यात 2 फिरकी गोलंदाजांसह खेळण्यावरुन म्हटलं. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार का? तसेच जसप्रीत बुमराह प्लेइंग ईलेव्हनचा भाग असणार की नाही? या 2 प्रश्नांची उत्तरं ही टॉस झाल्यानंतरच स्पष्ट होतील.