ENG vs WI 3rd T20i : तिसरा आणि अंतिम सामना, विंडीज शेवट गोड करणार?

England vs West Indies 3rd T20I : इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबादीर हॅरी ब्रूक याच्या खांद्यावर आहे. तर शाई होप विंडीजचं नेतृत्व करणार आहे. आता तिसऱ्या सामन्याचा निकाल काय लागतो? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

ENG vs WI 3rd T20i : तिसरा आणि अंतिम सामना, विंडीज शेवट गोड करणार?
England cricket team
Image Credit source: England Cricket X Account
| Updated on: Jun 10, 2025 | 2:17 PM

वेस्ट इंडिज क्रिकेट टीमची इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. विंडीजला इंग्लंड विरुद्ध या दौऱ्यात अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. इंग्लंडने विंडीजवर आधी 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत मात केली. त्यानंतर इंग्लंडने सलग 2 सामन्यांमध्ये विंडीजचा धुव्वा उडवत टी 20i मालिकाही जिंकली. त्यामुळे वेस्ट इंडिजसमोर जाता जाता शेवटचा सामना जिंकून इंग्लंड दौऱ्याची सांगता विजयाने करण्याचं आव्हान असणार आहे. आता वेस्ट इंडिजला यात किती यश येतं? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.

इंग्लंडने हॅरी ब्रूक याच्या नेतृत्वात विंडीज विरुद्ध एकदिवसीय मालिकेत सलग तिन्ही सामने जिंकले. इंग्लंडने यासह विंडीजला वनडे सीरिजमध्ये 3-0 क्लिन स्वीप केलं. त्यानंतर उभयसंघात 6 जूनपासून टी 20i मालिकेला सुरुवात झाली. इंग्लंडने टी 20i मालिकेतही विजयी सलामी दिली. त्यामुळे विंडीजसाठी मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दुसरा सामना हा करो या मरो असा होता. विंडीजच्या टीममध्ये एक एक वादळी खेळी करणारे फलंदाज आहेत. त्यामुळे विंडीज दुसऱ्या सामन्यातून कमबॅक करुन टी 20i मालिकेत 1-1 ने बरोबरी साधेल, अशी चाहत्यांना आशा होती. मात्र तसं होऊ शकलं नाही.

इंग्लंडने रविवारी 8 जून रोजी विंडीजचा धुव्वा उडवला. विंडीजने इंग्लंडसमोर 197 धावांचं आव्हान ठेवलेलं. इंग्लंडने हे आव्हान 9 बॉलआधी 6 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. इंग्लंडने अशाप्रकारे दुसरा सामना जिंकला आणि मालिकाही नावावर केली. इंग्लंडचा हा विंडीज विरुद्धचा सलग पाचवा विजय ठरला.

आता उभयसंघात टी 20i मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा मंगळवारी 10 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. इंग्लंडचा हा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्यासह विंडीजला रिकाम्या हाती पाठवण्याचा प्रयत्न असणार आहे. आता यात इंग्लंड यशस्वी होणार की विंडीजला शेवटच्या सामन्यात पहिला विजय मिळणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

दोन्ही संघ तुल्यबळ

इंग्लंडने वनडेनंतर टी 20i मालिका जिंकली असली तरी या मालिकेआधी विंडीज सरस होती. मात्र इंग्लंडने टी 20i मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून हिशोब बरोबर केला आहे. आतापर्यंत उभयसंघात 37 टी 20 सामने झाले आहेत.
या 37 पैकी इंग्लंडने 18 सामने जिंकले आहेत. तर विंडीजनेही 18 वेळा इंग्लंड विरुद्ध मैदान मारलं आहे. तर उभयसंघातील एक सामन्याचा निकाल लागू शकला नाही.