
आयपीएल 2025 स्पर्धेतील 29 वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ रोखला. दिल्ली कॅपिटल्सला विजयी लक्ष्य गाठताना 12 धावा तोकड्या पडल्या. या सामन्यात मुंबई इंडियन्सने हातातून गेलेला सामना खेचून आणला. शेवटी तीन रनआऊट करत सामना आपल्या पारड्यात खेचला. अशी सामन्यात रंगत असताना स्टेडियममध्ये मात्र भलतंच काही घडलं. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममधील एका स्टँडमध्ये राडा झाला. चाहत्यांचा पारा चढला आणि लाथाबुक्यांची बरसात झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओनुसार, चाहत्यांनी सामना सुरु असताना एकमेकांवर तुटून पडले. व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, काही फॅन्स या सामन्यादरम्यान भिडले आणि एकमेकांना मारत सुटले. यात एक महिला फॅन्सही सहभागी होती. तिनेही या हाणामारीत हात धुवून घेतले. महिला फॅन्सने सटासट चापट्या मारल्या. मात्र ही हाणामारी नेमकी का झाली त्याचं कारण अस्पष्ट आहे. त्याबाबतचा खुलासा अद्याप झालेला नाही. हाणामारी रोखण्यासाठी सुरक्षारक्षक उतरले. त्यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत केलं. मात्र हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
A fight between fans at the Arun Jaitley stadium last night. pic.twitter.com/UYXmAZbg1c
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 14, 2025
यापू्र्वी 8 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स सामन्यातही असाच प्रकार घडला होता. दोन्ही बाजूचे चाहते भिडले होते. पंजाब किंग्सची सहमालक असलेली प्रीति झिंटा चाहत्यांसाठी टीशर्ट फेकत होती. ही टीशर्ट मिळवण्यासाठी चाहते भिडले. तेव्हाही असाच काहीसा प्रकार घडला होता.
मुंबई इंडियन्ससाठी हा सामना खूपच खास होता. कारण मुंबईचं गणित आता जर तरवर आलं आहे. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 205 धावा केल्या आणि विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना दिल्लीचा संघ 19 षटकात 193 धावांवर बाद झाला. खरं तर हा सामना दिल्लीच्या पारड्यात होता. दिल्लीने 2 विकेट गमवून 135 धावा केल्या होत्या. पण मुंबईने चांगलं कमबॅक केलं.