टीम इंडियाच्या मागे ‘द वॉल’ उभा राहणार, राहुल द्रविड लवकरच रवी शास्त्रींची जागा घेणार?

| Updated on: Aug 11, 2021 | 1:06 PM

मागील बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या जागी राहुल द्रविडची वर्णी लागेल, अशी चर्चा आहे. नोव्हेंबर, 2021 मध्ये शास्त्रींचा कार्यकाळ संपणार असल्याने लवकरच संघात मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टीम इंडियाच्या मागे द वॉल उभा राहणार, राहुल द्रविड लवकरच रवी शास्त्रींची जागा घेणार?
शिखर धवन-राहुल द्रविड-रवी शास्त्री
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ मागील काही वर्षांपासून उत्तम कामगिरी करत आहे. मात्र तरी स्पर्धेच्या अखेरच्या काही सामन्यांत भारतीय खेळाडूंचा खेळ कमी पडतो ज्यामुळे एकही आयसीसी चषक भारताला मिळालेला नाही. त्यामुळे आगामी टी 20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) भारतीय संघ व्यवस्थापनात (Team India) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri)  यांच्या जागी माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची (Rahul Dravid) वर्णी लागू शकते. नॅशनल क्रिकेट अॅकेडमी (NCA) सोबतचा द्रविडचा करार नुकताच संपला असल्याने तो आता मुख्य प्रशिक्षकाच्या पदासाठी प्रयत्न करु शकतो आणि त्याची श्रीलंका दौऱ्यातील कामगिरी पाहता त्याला हे पद मिळू देखील शकते, अशा एक न अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

मागील काही वर्षांत भारतीय संघात युवा खेळाडूंच्या आगमनामुळे एक नवा जोश जन्माला आल्याचं दिसत आहे. भारतीय क्रिकेटचं भविष्य उज्ज्वल असल्याचं या खेळाडूंचा खेळ पाहून वाटतं. भारताची पूर्वीपासूनची कमजोरी असणारी वेगवान गोलंदाजीची कसरही युवा खेळाडू मोहम्मद सिराज, टी नटराजन, नवदीप सैनी यांनी भरुन काढली आहे. तसेच शार्दूल ठाकूर, दिपक चहार सारखे अष्टपैलूही भारतीय संघात आले आहेत. या सर्व तरुण हिऱ्यांना तराशणारा राहुल द्रविडच आहे. राहुल भारताच्या अंडर-19 आणि भारत ए संघाचा प्रशिक्षक असल्याने या सर्व नवख्या खेळाडूंसोबत बऱ्याच काळापासून काम करत आहे. तसेच NCA चा प्रमुख असताना त्याचं कामच नव्या खेळाडूंची निवड करण्याचं असल्याने त्याने ही कामगिरी चोख पार पाडली आहे. ज्यामुळे आता त्याला मुख्य प्रशिक्षक बनवण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

पुन्हा NCA प्रमुख होण्याचीही शक्यता

राहुल द्रविडचा बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अॅकेडमीमध्ये प्रमुख म्हणून असण्याचा कार्यकाळ 2 वर्षांचा नुकताच संपला आहे. मात्र तो पुन्हा या जागेसाठी अर्ज करु शकतो. त्यामुळे त्याची याजागी पुन्हा रुजु होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयाला दिलेल्या माहितीत सांगितले की, ‘राहुल द्रविडने NCA प्रमुखाच्या पदासाठी पुन्हा अर्ज देऊ शकतो. पण टी20 विश्व चषकानंतर नोव्हेंबर, 2021 मध्ये रवी शास्त्री यांचा करार संपत असल्याने द्रविडने मुख्य प्रशिक्षक होण संघासाठी अधिक चांगलं आहे.’

राहुल द्रविडची इच्छा काय?

श्रीलंका येथे सहा सामन्यांसाठी प्रशिक्षक असणाऱ्या राहुलला मुख्य कोच होण्याबद्दल विचारले असता, त्याने त्या गोष्टीत अधिक रस दाखवला नाही. तो म्हणाला,  ‘खरं सांगू तर मी आता जे करतो आहे, त्यात मला मजा येत आहे. त्यामुळे मी पुढील विचार तूर्तास तरी केलेला नाही.’

हे ही वाचा

टीम इंडियात मोठ्या बदलाच्या हालचाली, रवी शास्त्री टीम इंडियाचे प्रशिक्षकपद सोडणार?

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

(Former Indian Cricketer rahul Dravid may join team india as Head coach after T20 world cup)