
तर हेडिंगमध्ये तुम्ही ज्या खेळाडूबद्दल वाचलत ती खेळाडू म्हणजे भारताची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा ही आहे. दीप्तीचा आज (24 ऑगस्ट) रोजी 24वा वाढदिवस आहे. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असणारी दीप्ती टी-20 लीग्समध्ये देखील खेळते.

दीप्तिच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात फारच फिल्मी पद्धतीने झाली आहे. आठ वर्षाची असताना दीप्ती तिचा भाऊ सुमित शर्मासोबत मैदानात सहजच गेली होती. त्यावेळी दीप्तिजवळ क्रिकेटचा चेंडू येताच तिने तो चेंडू थेट स्टंप्सच्या दिशेने फेकला. तिचा हा अप्रतिम थ्रो पाहून मैदानात त्यावेळी उपस्थित असणारी महिला क्रिकेटपटू हेमलता काला अगदी आश्चर्यचकीत झाली.

हेमलताने सुमित शर्माला बोलावत त्याच्या बहिणीचे नाव विचारले. त्यानंतर तिने त्याला दीप्तीला क्रिकेट शिकण्यासाठी पाठवायला सांगितले, तसेच ही एकदिवस भारतासाठी नक्कीच खेळेल असेही सांगितले. दीप्तीनेही ही गोष्ट खरी करुन दाखवत नोव्हेंबर, 2014 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध भारतीय संघात पदार्पण केलं.

दीप्तिने 9 वर्षाची असताना क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 2010 मध्ये अंडर-19 संघासाठीच्या सराव सामन्यात दीप्तिने 65 धावा करत 3 विकेट्सही घेतल्या. तिच्या या कामगिरीनंतर तिची निवड यूपी अंडर-19 संघात झाली.

दीप्ति शर्माच्या नावावर एकदिवसीय महिला क्रिकेटमधील सर्वोच्च व्यक्तीगत धावसंख्या करणारी दुसरी खेळाडू आहे. तिने आयर्लंड संघाविरुद्ध 188 धावा ठोकल्या होत्या. जागतिक क्रिकेटमधील हा दुसरा सर्वोच्च व्यक्तीगत स्कोर असून भारतीय महिला क्रिकेटमध्ये इतका व्यक्तीगत स्कोर कोणीच करु शकलेले नाही.