
क्रिकेटविश्वात सध्याच्या काळात जसप्रीत बुमराह सर्वात बेस्ट गोलंदाज गणला जातो. तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याच्या गोलंदाजीचा दबदबा आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांना त्याची धास्ती लागून असते. आतापर्यंत जसप्रीत बुमराहने त्याच्या गोलंदाजीतून हे सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे सध्याच्या जागतिक गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानावर आहे. पण हार्षित राणाला तसं वाटत नाही. नुकतंच दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत त्याने याबाबत सांगितलं. या स्पर्धेत खेळताना एक मजेशीर ब्लाइंग रँकिंग गेममध्ये त्याने भाग घेतला. यावेळी त्याला सहा गोलंदाजांना रँकिंग द्यायची होती. तेव्हा जसप्रीत बुमराहला त्याने दुसऱ्या स्थानावर ठेवलं. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडीओ दिल्ली प्रीमियर लीगच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल झाला आहे. अँकर शेफाली बग्गाने त्याला भारतीय गोलंदाजांचे नाव न बघता रँकिंग करण्यास सांगितलं.
सर्वात प्रथम जसप्रीत बुमराह आला तेव्हा त्याला त्याने दुसऱ्या क्रमांकावर ठेवलं. यानंतर कोलकाता नाइट रायडर्सचा आणि त्याचा जोडीदार वरूण चक्रवर्तीचं नाव आलं. त्याला त्याने सहाव्या क्रमांकावर ठेवलं. अक्षर पटेलला चौथ्या स्थानावर ठेवलं. त्यानंतर अर्शदीप सिंगला तिसऱ्या क्रमांकावर ठेवलं. त्यानंतर पाचव्या क्रमांकासाठी प्रसिद्ध कृष्णाला पसंती दिली. त्यानंतर कुलदीप यादवचं नाव आलं. तेव्हा त्याने त्याला पहिला नंबर दिला. कुलदीप यादवला पहिल्या नंबर दिल्यानंतर त्याने सांगितलं की, ‘कुलदीप भावा, यासाठी मी तुझ्याकडून काहीतरी घेईन. तुला नंबर 1 केलं आहे.’
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी हार्षित राणाची निवड झाली आहे. पण त्याचं नाव या यादीत येतात टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. माजी क्रिकेटपटूंच्या मते त्याच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णा योग्य उमेदवार होता. कारण हार्षित फॉर्म काही चांगला नाही. दरम्यान, हार्षित राणा दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सकडून खेळत असून कर्णधार आहे. त्याने 19.18 च्या सरासरीने 11 विकेट घेतल्या आहेत.