बिग बॅश लीगमध्ये विजयाचा नवा मानकरी, हॉबार्ट हरिकन्सने सिडनी थंडर्सला लोळवलं

बिग बॅश लीग 2024-25 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिडनी थंडर आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात होबार्ट हरिकेन्सने सिडनी थंडरचा पराभव करून जेतेपद आपल्या नावावर केलं. पहिल्यांदाच हा किताब या संघाने पटकावला आहे. या सामन्यात विजयाची शिल्पकार ठरला तो मिचेल ओवन

बिग बॅश लीगमध्ये विजयाचा नवा मानकरी, हॉबार्ट हरिकन्सने सिडनी थंडर्सला लोळवलं
Image Credit source: (फोटो- Steve Bell/Getty Images)
| Updated on: Jan 27, 2025 | 7:39 PM

बिग बॅश लीग 2024-25 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात होबार्ड हरिकेन्स आणि सिडनी थंडर हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल होबार्ट हरिकेन्सच्या बाजूने लागला. कर्णधार नाथन एलिसने खेळपट्टीचा अंदाज घेऊन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला असंच म्हणावं लागेल. सिडनी थंडरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 182 धावा केल्या आणि विजयासाठी 183 धावांचं आव्हान मिळालं. हे होबार्ट हरिकेन्सने अवघ्या 14.1 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. होबार्ट हरिकेन्सने सात वर्षानंतर बिग बॅश लीगची अंतिम फेरी गाठली होती. पण यावेळी त्याने विजय मिळवण्यात कोणतीच चूक केली नाही. होबार्ट हरिकेन्स संघाचा साखळी फेरीपासून बाद फेरीत दबदबा दिसून आला. साखळी फेरीत 10 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे गुणतालिकेत अव्वल स्थानी होती. या सामन्यात मिचेल ओवनचा झंझावात पाहायला मिळाला.

विजयासाठी दिलेल्या 183 धावांचा पाठलाग करण्यासाठी मिचेल ओवन आणि कॅलेब जेवेल ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 109 धावांची भागादारी केली. या भागीदारीत मोठा वाटा हा एकट्या मिचेल ओवनचा होता. त्याने त्यावेळी 96 धावा एकट्याने ठोकल्या होत्या. सिडनी थंडर्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्याने 42 चेंडूत 6 चौकार आणि 11 षटकाराच्या मदतीने 108 धावा केल्या. त्यामुळे संघाने 7 विकेट आणि 35 चेंडू राखून विजय मिळवला. मिचेल ओवनने सांगितलं की,खूप भरून आलं आहे, शब्द फुटत नाहीत.सर्व चाहत्यांचे खूप आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद. फार पूर्वीसारखे वाटते. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये मी जे आनंद घेत होतो तेच करत होतो, सुदैवाने आज रात्रीही ते केले.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

होबार्ट हरिकेन्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल ओवेन, कॅलेब ज्युवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), बेन मॅकडरमॉट, निखिल चौधरी, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, नॅथन एलिस (कर्णधार), कॅमेरॉन गॅनन, पीटर हॅटझोग्लू, रिले मेरेडिथ.

सिडनी थंडर (प्लेइंग इलेव्हन): जेसन संघा, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मॅथ्यू गिल्क्स, सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), ऑलिव्हर डेव्हिस, ख्रिस ग्रीन, जॉर्ज गार्टन, नॅथन मॅकअँड्र्यू, टॉम अँड्र्यूज, वेस अगर, तन्वीर संघा.