
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला होता. माध्यमांमध्ये हा वाद बराच चघळला गेला. सोशल मीडियावर विराट आणि नवीन उल हकने ठेवलेल्या पोस्ट आणि स्टोरीजच्या बातम्या होत होत्या. त्यामुळे या दोघांमध्ये बरंच काही बिनसलं असून मैदानाबाहेरही त्यावर तोडगा निघल्याचं दिसून आलं होतं. पण वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरू असताना विराट आणि नवीन उल हक यांच्यात समेट घडल्याचं दिसून आलं. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. समेट झालं यात काही आश्चर्याची गोष्ट नाही. पण हे प्रकरण नेमकं शांत कसं झालं याबाबतची उत्सुकता क्रीडाप्रेमींमध्ये होती. आता लखनऊ सुपरजायंट्सने एक व्हिडीओ यूट्युबवर पोस्ट केला आहे. यात नवीन उल हकने या पॅचअपबाबत खुलासा केला आहे. माझ्यात आणि विराट कोहली यांच्यात पर्सनल काही नव्हतं. जे काही झालं ते मैदानात झालं असं नवीन उल हकने सांगितलं.
“मी सामन्यादरम्यानं लाँग ऑनला फिल्डिंगसाठी जात होतो. मी आणि विराट कोहली जवळून जात होतो. तेव्हा माझं आणि विराट कोहलीचं एकमेकांकडे बघणं झालं. विराटने लगेच सांगितलं की आता हे संपवायला हवं. तेव्हा मी देखील होकार देत हे संपवायला हवं असं सांगितलं. त्याच्या मनात माझ्याबद्दल काही द्वेष नव्हता. जे काही झालं ते मैदानात झालं.”, असं नवीन उल हकने लखनऊ सुपर जायंट्सच्या यूट्युब चॅनेलवर सांगितलं.
“एक खेळाडू म्हणून मी त्याचा खूप आदर करतो. जितकं करता येईल तितका करत आहे. त्याला समजून घेणं आणि त्याच्या कामगिरीची प्रशंसा करणं गरजेचं आहे. जेव्हा त्याने माझ्याकडे पाहून बोललं की आता हे संपवून टाकू. तेव्हा आम्ही दोघं एकमेकांकडे बघून हसलो. तसेच चांगली मैत्री ठेवण्याचा निर्णय घेतला.”, असं नवीन उल हक पुढे म्हणाला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये सामना होता. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जिंकला होता. आरसीबीने 20 षटकात 9 गडी गमवून 126 धावा केल्या आणि विजयासाठी 127 धावांचं आव्हान दिलं. पण लखनऊचा संघ 108 धावा करू शकला आणि 18 धावांनी पराभव झाला. दुसऱ्या डावात नवीन उल हक फलंदाजीसाठी उतरला तेव्हा विराटचा त्याच्याशा वाद झाला. नवीन उल हकने 13 चेंडूत 13 धावा केल्या. सामन्यानंतर या वादाचं रुपांतर तीव्र भांडणात झालं. त्यानंतर हा वाद काही दिवस सुरुच राहिला. आता अखेर त्यावर पडदा पडला असंच म्हणावं लागेल.