Video: ‘बेजबॉल खेळ.. मला बघायचं आहे’, मोहम्मद सिराजने जो रूटला दिलं खुलं आव्हान

अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर होणार आहे. या सामन्यात इंग्लंडचे दोन विकेट गेल्यानंतर फलंदाजांनी त्यांच्या खेळण्याच्या शैलीत बदल केला. यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने जो रूटला डिवचलं.

Video: बेजबॉल खेळ.. मला बघायचं आहे, मोहम्मद सिराजने जो रूटला दिलं खुलं आव्हान
IND vs ENG: 'बेजबॉल खेळ.. मला बघायचं आहे', मोहम्मद सिराजने जो रूटला दिलं खुलं आव्हान
Image Credit source: BCCI/X
| Updated on: Jul 10, 2025 | 9:10 PM

इंग्लंडने मागच्या काही वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये नवी रणनिती अवलंबली आहे. कसोटीत वनडेसारखी फलंदाजी करून सामन्याचं चित्र बदलण्याची ताकद ठेवली आहे. त्याचे काही चांगले वाईट परिणाम इंग्लंड कसोटी क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले आहेत. पण बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडच्या फलंदाजांचं डोकं ठिकाणावर आलं आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी आपल्या शैलीत बदल केला आहे. त्यांची सावध खेळी पाहून भारतीय गोलंदाजांच्या बरोबर लक्षात आलं आहे. यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने डिवचणं सुरु केलं. तसेच जो रूटला खुलं आव्हान दिलं. बेजबॉल रणनितीनुसार, इंग्लंडने आतापर्यंत 72 वेळा फलंदाजी केली आहे. यात इंग्लंडने पहिल्या 40 षटकात 3 पेक्षा कमी नेट रनरेटने खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या डावात इंग्लंडचा संघ संथ गतीने खेळला होता.

लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात दबावात दिसला. मोहम्मद सिराजने जो रूटला डिवचलं. कारण तो सतत चेंडू सोडत होता. त्यामुळे मोहम्मद सिराज त्याला ‘बेज बेज बेजबॉल..बेजबॉल खेळा. मला पाहायचं आहे.’ इतकं स्लेजिंग करूनही जो रूटने आपल्या फलंदाजीत काही बदल केला नाही. तो आरामात खेळताना दिसला. कारण दुसऱ्या कसोटी सामन्यात बेजबॉल रणनिती अंगाशी आली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारताचा विजय सोपा झाला होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने रणनितीत बदल केला आहे.

दरम्यान, इंग्लंडचे इतर फलंदाज तग धरत नसताना जो रूट मात्र पाय घट्ट रोवून उभा आहे. जो रूटने 50 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं. आता त्याची शतकाच्या दिशेने कूच सुरु झाली आहे. जो रूटने मैदानात पाय घट्ट रोवले तर टीम इंडियाला कठीण जाईल. त्यामुळे झटपट विकेट घेणं खूपच महत्त्वाचं आहे. दुसरीकडे, मोहम्मद सिराज विकेटासाठी धडपड करताना दिसत आहे. मात्र त्याला काही यश मिळालेलं नाही. नितीश कुमार रेड्डीने 2, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी एक गडी बाद केला आहे.